ECINET पोर्टलवर पुन्हा पूर्वीच्या स्वरूपातील Form 6 उपलब्ध; नवमतदारांना SIRशी संबंधित अतिरिक्त माहिती भरण्याची गरज नाही
नवीन मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मतदार यादीत पहिल्यांदा नाव समाविष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Form 6 सोबत जोडण्यात आलेल्या SIR संबंधित अतिरिक्त पत्राबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. ज्या राज्यांमध्ये Special Intensive Revision (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या राज्यांच्या ECINET पोर्टलवरून Form 6 सोबतचे अतिरिक्त Declaration/Annexure हटवण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबर रोजी SIR नसलेल्या कालावधीत Registration of Electors Rules, 1960 अंतर्गत लागू असलेला नियमित अर्ज वापरण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत SIR पूर्ण झालेल्या राज्यांमधील Form 6 मध्ये बदल करण्यात आला आहे.
SIR प्रक्रियेदरम्यान नव्या मतदारांकडून Form 6 व्यतिरिक्त एक स्वतंत्र Declaration/Annexure D भरून घेतले जात होते. या घोषणापत्रात अर्जदाराचे स्वतःचे नाव मागील SIRमध्ये तयार झालेल्या मतदार यादीत होते का, याची माहिती विचारली जात होती. नाव नसल्यास आई-वडील किंवा आजी-आजोबांपैकी कोणाचे नाव त्या जुन्या मतदार यादीत होते का, याबाबतही माहिती द्यावी लागत होती. यापैकी कोणतीही नोंद उपलब्ध नसल्यास तिसरा पर्याय निवडण्याची सुविधा देण्यात आली होती.
निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी Form 6 सोबत Declaration Form वापरण्याची तरतूद करण्यात आली होती. आयोगाच्या दस्तऐवजानुसार, SIRच्या प्रक्रियेदरम्यान नवमतदारांना Form 6 आणि संबंधित Declaration Form उपलब्ध करून देण्याची व्यवस्था होती.
दरम्यान, ऑनलाइन Form 6 सोबत जोडलेल्या अतिरिक्त पत्रात SIR ही प्रक्रिया ‘Non-Mandatory’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, ही माहिती भरल्याशिवाय अर्ज पुढे सबमिट करता येत नसल्याच्या तक्रारी आणि चर्चाही समोर आल्या होत्या.
आता SIR प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांसाठी ECINET पोर्टलवर Form 6 पुन्हा नियमित स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांना Form 6 भरताना SIRशी संबंधित अतिरिक्त माहिती किंवा Declaration भरण्याचा पर्याय दिसणार नाही. निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सध्या नवीन मतदार नोंदणीसाठी Form 6 उपलब्ध असल्याचे दिसून येते.