मुंबईतील शिवाजी पार्क येथे २ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी CJPकडून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजी पार्क सिटिझन्स फोरमने CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
दरम्यान, आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने नागरिक आणि समर्थक जमल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी आंदोलनाचे आयोजक तसेच ४०० ते ५०० अज्ञात समर्थक आणि आंदोलकांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
आंदोलनस्थळी अचानक बिघडली तब्येत
मृत गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई हे मूळचे केरळचे रहिवासी होते. ते ठाण्यातील दोस्ती वेस्ट काउंटीच्या बी विंगमध्ये राहत होते. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते CJPचे आंदोलन पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये पोहोचले होते.
आंदोलनस्थळी आल्यानंतर काही वेळातच, सुमारे पाच वाजता, त्यांना छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर त्यांचे मित्र आणि घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी CPR देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना शिवाजी पार्कमधील सुश्रुषा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे समोर आले असून, या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
🚨 अभिजीत दिपके को गिरफ्तार करो शिवाजी पार्क में CJP के प्रदर्शन के दौरान एक 75 वर्षीय बुजुर्ग को हार्ट अटैक आया और उनकी मौत हो गई। शाम करीब 5 बजे उन्हें सीने में तेज दर्द हुआ। पुलिस और उनके साथियों ने तुरंत मदद की और अस्पताल पहुंचाया। इलाज के दौरान उनकी मृत्यु हो गई। https://t.co/q6NnPqvIFc
— Manoj Singh (@mksanalytiq) October 3, 2026
CJP आयोजकांसह ४०० ते ५०० जणांवर गुन्हा
पोलिसांनी आंदोलनाच्या आयोजकांसह ४०० ते ५०० अज्ञात समर्थक आणि आंदोलकांविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १८९ आणि २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७(१)(३) आणि १३५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. शिवाजी पार्कमधील जमावाबाबतचे निर्बंध, वाहतूक, नागरिकांना होणारी गैरसोय आणि ध्वनिप्रदूषण यांसह विविध कारणांचा उल्लेख परवानगी नाकारताना करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतरही आंदोलन आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे.
सिद्धी देओळेकरांचीही पोलिसांत तक्रार
या प्रकरणात शिवाजी पार्कमधील रहिवासी आणि वकील सिद्धी देओळेकर यांनी यापूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका, सौरव दास, रत्ना सिंह आणि इतरांचा उल्लेख करण्यात आला होता.
पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलन पुढे नेण्याचा आणि मोठ्या संख्येने गर्दी जमवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन आयोजकांविरोधात स्वतंत्र कायदेशीर कारवाई केली आहे.
दिपके यांच्याविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी
पिल्लई यांच्या मृत्यूनंतर शिवाजी पार्क सिटिझन्स फोरमने अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात फोरमने मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार या मागणीवर पोलिसांनी अद्याप दिपके यांच्याविरोधात हत्येचा स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला नाही.
हे आंदोलन निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेच्या विरोधात आयोजित करण्यात आले होते. CJPकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.