ताप, अंगदुखी आणि तीव्र वेदनांमुळे काही तास विश्रांती; संध्याकाळपर्यंत पुन्हा आंदोलनात सहभागी होण्याची दिली ग्वाही
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कथित NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. अचानक प्रकृती खालावल्याने दीपके यांना आंदोलनस्थळ काही काळासाठी सोडावे लागले. आंदोलनस्थळ सोडताना त्यांनी उपस्थित आंदोलकांची माफी मागितली आणि काही तास विश्रांतीनंतर पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले.
गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके गुरुवारी प्रकृती अस्वस्थ झाल्याने मंचावर उपस्थित राहू शकले नाहीत. ताप, अंगदुखी आणि तीव्र वेदनांमुळे त्यांना विश्रांतीची आवश्यकता भासल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही काळ आंदोलनातून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
अभिजीत दीपके हे २० जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर सातत्याने आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. अमेरिकेतून दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर लगेचच आंदोलनाच्या तयारीला सुरुवात झाल्याने त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळाला नव्हता. दिवस-रात्र सुरू असलेली गर्दी, सातत्याने आंदोलकांशी संवाद, विविध नेत्यांच्या भेटी, पुढील रणनीतीचे नियोजन तसेच पोलीस, प्रशासन आणि सरकारशी सुरू असलेला संवाद यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
I’ve been down with a fever and severe body pain for the last few days, but I’ve been pushing through with painkillers.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 23, 2026
My apologies if you don’t see me at Jantar Mantar today. I need to get a few hours of rest and recover.
Will be back at the protest site by evening.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना वारंवार शारीरिक त्रास जाणवत होता. यापूर्वी मंगळवारी त्यांना उलट्यांचा त्रास झाला होता. तसेच आंदोलनाच्या मंचावर असताना त्यांना चक्करही आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतरही त्यांनी औषधांच्या मदतीने आंदोलन सुरू ठेवले होते. मात्र गुरुवारी प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना विश्रांती घेणे भाग पडले.
आंदोलनस्थळ सोडण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना प्रकृतीची माहिती दिली. त्यांनी आंदोलकांची माफी मागत काही तास विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले.
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे, "मला ताप आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शरीरात तीव्र वेदना होत आहेत. वेदनाशामक औषधांच्या मदतीने मी आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आज जर मी जंतर-मंतरवर दिसलो नाही तर कृपया मला माफ करा. मला काही तास विश्रांती घेऊन बरे होण्याची गरज आहे. मी संध्याकाळपर्यंत पुन्हा आंदोलनस्थळी परत येईन."
त्यांच्या या संदेशानंतर आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थी आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गेल्या अनेक आठवड्यांपासून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दीपके यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा जंतर-मंतरवर परत येऊन आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन अभिजीत दीपके यांनी समर्थकांना दिले आहे. त्यामुळे काही तासांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.