चिखली (Cheque dishonour case) : धनादेश (चेक) बाऊन्स प्रकरणात आरोपीला १ वर्षाचा साधा कारावास आणि फिर्यादीला १ लाख २० हजार रुपये भरपाई दोन महिन्यांत देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल चिखली येथील न्यायालयाने दिला आहे. माननीय न्यायमूर्ती आय. वाय. ए. खान यांनी हा निकाल सुनावला.
प्रकरणाची पाश्वभूमी:
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी 'निशांत मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, शाखा चिखली' यांच्याकडून आरोपी श्री उत्तम ओकार हीवाळे (रा. वळती, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांनी मालमत्ता तारणावर ०१/०६/२०१९ रोजी ७०,०००/- रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आरोपीने कर्जाचे हप्ते नियमित न भरल्याने कर्ज खाते थकीत झाले होते.
संस्थेने थकीत कर्जाची मागणी केली असता, आरोपीने दि. ०३/१२/२०२० रोजी आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (शाखा चिखली) च्या खात्याचा ५९,७१८/- रुपयांचा धनादेश स्वाक्षरी करून दिला व तो वटण्याची हमी दिली. मात्र, सदर धनादेश बँकेत जमा केला असता "खात्यात अपुरी रक्कम" (Insufficient Funds) या शेऱ्यासह परत आला.
न्यायालयाचा निर्णय व शिक्षा:
धनादेश अनादर झाल्याने फिर्यादी संस्थेने आरोपीविरुद्ध चिखली न्यायालयात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम १३८ अन्वये तक्रार दाखल केली. न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे, कागदपत्रे आणि वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी उत्तम ओकार हीवाळे यास दोषी ठरवले.
- फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २५५ (२) नुसार आरोपीस १ वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
- कलम ३५७ (३) नुसार आरोपीने फिर्यादीला १,२०,०००/- रुपये भरपाई दोन महिन्यांच्या आत देणे बंधनकारक केले आहे.
- भरपाईची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ६० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
- सदर प्रकरणात फिर्यादी निशांत मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, चिखली यांच्या वतीने ॲड. जयश्री कुटे मॅडम यांनी काम पाहिले व यशस्वी युक्तिवाद केला.