हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून सुमारे 22 लाख 16 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रस्टचे सचिव अलीमोहिन फय्याजोद्दीन इनामदार, अध्यक्ष नईम अहमद अब्दुल कादर अन्सारी, उपाध्यक्ष फय्याजोद्दीन बाहोद्दीन इनामदार आणि कोषाध्यक्ष अंजुम कौसर अलीमोहिन या चौघांनी 23 सप्टेंबर 2014 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत देणगीदारांनी ट्रस्टला दिलेली रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळती करून घेतली.
तसेच मोठी रक्कम रोख स्वरूपात काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि देणगीदारांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रोख देणग्यांमधूनही मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यानुसार दहशतवाद विरोधी पथक, नांदेड युनिटचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजीबखान नसीबखान पठाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून 23 सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम 318, 319 आणि 316 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अय्युब शेख करीत असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.