माय-लेकीवर रामनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा; दोघींचा शोध सुरू
चंद्रपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा १० ते १५ टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत माय-लेकीने तब्बल ११ जणांकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी निखिता बारई आणि तिची आई कल्याणी दास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघींचा शोध सुरू आहे.
इंडस्ट्रियल एरिया परिसरात राहणाऱ्या उमा पप्पू भट (३३) या कॅटरिंग व्यवसाय करतात. सन २०२४ मध्ये त्यांच्या शेजारी राहणाऱ्या निखिता बारई व तिची आई कल्याणी दास यांनी भट यांच्याशी संपर्क साधला. एका व्यक्तीकडे शेअर ट्रेडिंगचे काम असून त्याच्याकडे पैसे गुंतवल्यास दरमहा १० ते १५ टक्के कमिशन मिळेल, असे सांगून त्यांनी भट यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.
सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीवर काही रक्कम परत देण्यात आली. त्यामुळे आरोपींवर विश्वास बसल्यानंतर भट यांनी स्वतःची बचत, सोन्यावर घेतलेले कर्ज तसेच मित्रांकडून उधार घेतलेली रक्कम अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ५५ लाख रुपये त्यांच्याकडे दिले.
मात्र मार्च २०२६ नंतर परतावा मिळणे बंद झाले. गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर ‘भैय्याचा अपघात झाला आहे’ असे कारण सांगून आरोपींनी वेळ मारून नेली. त्यानंतर काही दिवसांनी दोघींच्या घराला कुलूप असल्याचे आढळून आले. त्या परिसरातून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भट यांनी पोलिसांत धाव घेतली.
तपासादरम्यान आरोपी माय-लेकीने आणखी दहा जणांकडूनही अशाच पद्धतीने पैसे घेतल्याचे समोर आले. या दहा जणांकडून ८९ लाख १२ हजार रुपये घेतल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
फसवणूक झालेल्यांमध्ये उमा भट (५५ लाख), आदित्य मनोज मलिक (२२ लाख ५० हजार), सीमा संजय मुजमदार (१३ लाख ५० हजार), रोहित उर्फ पप्पू रणसिंग भट (११ लाख), सुप्रिया नरेश (९ लाख), जयंती दिनेश दास (७ लाख), रेखा मनोज पॉल (७ लाख), शिवम कृष्ण शहा (६ लाख ३० हजार), श्रुती संजय दास (६ लाख), अजहर शेख (६ लाख) आणि सचिन दिनेश दास (८२ हजार) यांचा समावेश आहे.
उमा भट यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सौरभ रामचंद्र साळुंखे तपास करीत आहेत.