२०२२ मध्ये ०.३ असलेले वार्षिक परजीवी प्रादुर्भाव प्रमाण २०२५ मध्ये ०.८ वर; रक्त तपासण्यांचे प्रमाणही महत्त्वाचे
मुंबईतील मलेरियाचे संकट कमी होण्याऐवजी पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी तपासली असता मलेरियासाठी करण्यात आलेल्या रक्त तपासण्यांमध्ये परजीवी आढळण्याचे प्रमाण अपेक्षित पातळीवर घटलेले नाही. विशेषतः २०२२ नंतर मलेरियाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे.
मलेरियाच्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी सकारात्मक रक्तपट्टी प्रमाण म्हणजेच स्लाईड पॉझिटिव्हिटी रेट, वार्षिक परजीवी प्रादुर्भाव प्रमाण (अॅन्युअल पॅरासाईट इन्सिडेन्स) आणि वार्षिक रक्त तपासणी प्रमाण (अॅन्युअल ब्लड एक्झामिनेशन रेट) हे प्रमुख निकष मानले जातात.
रक्त तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी ज्या नमुन्यांमध्ये मलेरियाचा परजीवी आढळतो, त्या प्रमाणाला सकारात्मक रक्तपट्टी प्रमाण म्हटले जाते. गेल्या दशकातील आकडेवारीत हे प्रमाण अत्यल्प राहिले असले तरी त्यामध्ये अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे मलेरिया नियंत्रणाच्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित परिणाम साधला गेला नसल्याचे संकेत मिळतात.
दरम्यान, प्रत्येक हजार देखरेखीखालील लोकसंख्येमागे निश्चित झालेल्या मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण वार्षिक परजीवी प्रादुर्भाव प्रमाणातून स्पष्ट होते. २०२२ मध्ये हे प्रमाण ०.३ होते. त्यानंतर २०२३ मध्ये ते ०.५, २०२४ मध्ये ०.६, तर २०२५ मध्ये ०.८ पर्यंत पोहोचले. या वाढत्या आकडेवारीमुळे मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट होते.
मलेरियाचे रुग्ण वेळेत शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत हिवतापासाठी होणाऱ्या रक्तनमुन्यांच्या तपासणीसाठी केंद्र सरकारने मुंबई महापालिकेला १२ टक्क्यांचे उद्दिष्ट दिले आहे. मलेरियाच्या प्रसारावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी हे लक्ष्य गाठणे महत्त्वाचे ठरणार आहे.