अप्पापाडा येथील BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप; घटनास्थळी रिकाम्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या
मुंबईतील मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमनला त्याच्या काही मित्रांनी घरातून बाहेर नेल्यानंतर अप्पापाडा येथील BMC गार्डनमध्ये नेले आणि तिथे त्याला ड्रग्जचे अनेक इंजेक्शन देण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून अमनच्या चार मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांतीनगर परिसरात राहणारे काही तरुण अमनला घरातून घेऊन गेले होते. त्यानंतर त्याला अप्पापाडा येथील BMC गार्डनमध्ये नेण्यात आले. तिथे अमनला ड्रग्जची अनेक इंजेक्शन्स देण्यात आल्याचा आरोप आहे. इंजेक्शननंतर अमनची प्रकृती बिघडली. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेले नाही. वेळेत उपचार मिळाले असते तर अमनचा जीव वाचला असता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पुढील विडिओ तुम्हाला विचलित करू शकतात.
मुंबईत नेमकं चाललंय काय ? कुरार व्हिलेजमध्ये BMC च्या गार्डनमध्ये भर दिवसा हे तरुण ड्रग्सचे इंजेक्शन घेतायेत.. यात 20 वर्षीय तरुणाचा तडफडून ड्रग्सच्या ओव्हर डोसनं मृत्यू झालाय.. हे VIS भयंकर असून ड्रग्सचं जाळं किती विस्तारलंय हे सांगणाराय #DRUNGS #MUMBAI #BMC https://t.co/Y0MxXI8Fht
— Pooja ujagare (@PoojaUjagare) October 5, 2026
या घटनेशी संबंधित असल्याचा दावा केला जाणारा एक व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये अमन नशेच्या अवस्थेत तडफडताना दिसत असून त्याच्या आजूबाजूला काही तरुण असल्याचे दिसते. मात्र, व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि त्यातील घटना या प्रकरणाशी संबंधित आहेत का, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या व्हिडीओमागचे सत्य स्पष्ट होणार आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अमन यापूर्वी ड्रग्जच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. मात्र, मित्रांसोबत झालेल्या वादानंतर त्याने काही काळ नशेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यांनंतर त्याचे मित्र पुन्हा त्याला सोबत घेऊन गेले आणि त्यानंतर ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, अमनची प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले इतर तरुणही नशेच्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आणि अमनच्या चार मित्रांना ताब्यात घेतले.
अप्पापाडा येथील BMC गार्डनमध्ये फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली. तपासादरम्यान घटनास्थळी नशेशी संबंधित काही साहित्य आणि रिकाम्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. पोलिसांकडून या साहित्याची तपासणी करण्यात येत आहे.
अमनला गार्डनमध्ये कोण घेऊन गेले, त्याला नेमक्या कोणत्या प्रकारचे ड्रग्ज देण्यात आले, इंजेक्शन कोणी दिले आणि प्रकृती खालावल्यानंतर त्याला रुग्णालयात का नेण्यात आले नाही, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून शोधली जात आहेत. तसेच अप्पापाडा येथील या गार्डन परिसरात यापूर्वीपासून ड्रग्जचा वापर सुरू होता का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. अमनच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर स्पष्ट होणार आहे.