राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे-शिवसेना ठाकरे गटाचा संयुक्त मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याची मागणी
मुंबईतील 4 ऑक्टोबरच्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त महामोर्चाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला असून, आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. पुढे हा मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्षेप नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी संयुक्त महामोर्चाचे आयोजन केले आहे.
यापूर्वी प्रस्तावित मार्गानुसार भायखळ्यापासून मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र आता मार्ग बदलून मेट्रो सिनेमा जंक्शन हे सुरुवातीचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच्या नियोजित मार्गाच्या तुलनेत मोर्चाचे अंतर कमी झाले आहे.
4 ऑक्टोबर रोजी सकाळी मोर्चासाठी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होणार असून, सकाळी 11 वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मोर्चा पुढे मुंबई महापालिका मुख्यालयाच्या परिसरात पोहोचेल. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर होणार असून त्यासाठी व्यासपीठ उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या महामोर्चात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात राज्यातील मनसैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इतर राजकीय पक्षांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मोर्चाच्या बदललेल्या मार्गामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मोर्चादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत तसेच ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.