नवी दिल्ली (Rahul Gandhi Criticism) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘Melody’ टॉफी भेट दिल्यानंतर देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, “देशावर आर्थिक संकटाचे ढग घोंगावत आहेत आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये मिठाई वाटत फिरत आहेत. शेतकरी, युवक, महिला, कामगार आणि छोटे व्यापारी अश्रूंमध्ये आहेत, तर पंतप्रधान हसत रील्स बनवत आहेत आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवत आहेत.”
“हे नेतृत्व नसून एक प्रकारचा फार्स आहे,” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
आर्थिक तूफ़ान सर पर है, और हमारे प्रधानमंत्री इटली में टॉफ़ी बाँट रहे हैं!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 20, 2026
किसान, युवा, महिलाएँ, मज़दूर और छोटे व्यापारी सब रो रहे हैं - PM हंसकर रील बना रहे हैं, और BJP वाले ताली बजा रहे हैं।
यह नेतृत्व नहीं, नौटंकी है।
खर्गेंचाही मोदींवर हल्लाबोल
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना “मोदीजींना जनतेने भाषणांची ‘मेलोडी’ ऐकत राहावे आणि सरकारच्या लुटीचे ‘मिझरी’ सहन करावे असे वाटते,” असे म्हटले.
खर्गे यांनी X वरील पोस्टमध्ये दावा केला की, “मोदी सरकारच्या गेल्या ११ वर्षांत प्रत्येक भारतीयावरील सरासरी कर्ज ११ पट वाढले आहे. तर २२९ उद्योगपती आणि नव्याने वाढलेल्या २६ अब्जाधीशांची संपत्ती ९७.५० लाख कोटी रुपयांवर गेली आहे.”
तसेच वाढती महागाई, बेरोजगारी आणि गुंतवणूकदारांचा घटता विश्वास यामुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करत असल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला.
Modi ji wants the public to enjoy the “melody” of speeches while surviving the “misery” of his government's loot !
— Mallikarjun Kharge (@kharge) May 20, 2026
In the past 11 years, under Modi Govt, the average debt per Indian has increased 11-fold....!!
...while the wealth of 229 tycoons, along with 26 newly added… pic.twitter.com/nyuuUuyjlY
‘Melody’ टॉफीमुळे सोशल मीडियावर चर्चा
मंगळवारी पंतप्रधान मोदी रोम येथे पोहोचल्यानंतर त्यांनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मोदी यांनी मेलोनी यांना ‘Melody’ टॉफी भेट दिली. त्यानंतर मेलोनी यांनी X वर एक हलकाफुलका व्हिडीओ शेअर करत “Thank you for the gift” असे लिहिले.
यापूर्वीही मेलोनी यांनी मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत “Welcome to Rome, my friend!” असे म्हटले होते.
पाच देशांच्या दौऱ्याचा शेवट इटलीत
पंतप्रधान मोदींचा इटली दौरा हा त्यांच्या पाच देशांच्या परराष्ट्र दौऱ्याचा अंतिम टप्पा आहे. या दौऱ्यात त्यांनी नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड्स आणि संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली.
भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा २०२५-२०२९ अंतर्गत व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर असल्याचे सांगितले जात आहे.