बाधित शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थ आक्रमक; मोजणीच्या दिवशी लोकप्रतिनिधींनी गावात उपस्थित राहण्याची मागणी
कुरुंदा : वसमत तालुक्यातील सेंदूरसेना गावाने प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी गावबंदीचे पत्रक काढले असून, महामार्गाची मोजणी करण्यात आल्यास यापुढे पूर्ण गावबंदी करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या पत्रकाद्वारे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांसह लोकप्रतिनिधींना भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होणार नाहीत, त्यांच्याविरोधात भविष्यात पूर्ण गावबंदी केली जाईल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मोजणीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची उपस्थिती बंधनकारक
शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीची तारीख निश्चित झाल्यास त्या दिवशी आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी गावात उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे ग्रामस्थांनी पत्रकातून स्पष्ट केले आहे. अन्यथा 100 टक्के कायमस्वरूपी गावबंदी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सेंदूरसेना ग्रामस्थांची प्रमुख मागणी शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्पच रद्द करण्याची आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. "शेतकरी जगला तर देश जगेल," अशी भूमिका पत्रकातून मांडण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महामार्गाच्या मोजणीला विरोध करण्यासाठी गावात येणाऱ्यांचे स्वागत केले जाईल, असेही पत्रकात म्हटले आहे. मात्र, गावात येणाऱ्या विरोधकांना "चपलांचा हार घालण्यात येईल", असा कठोर इशाराही देण्यात आला आहे. अशा प्रकारे अपमान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीचीच राहील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध
शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक गावांमधील शेतीचे नुकसान होणार असल्याने गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. जमीन संपादन तसेच मोजणीच्या प्रक्रियेलाही विविध ठिकाणी विरोध केला जात आहे. आता सेंदूरसेना गावाने थेट गावबंदीचा इशारा देत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.