मुंबई (Rajya Sabha Bypoll) : राज्यसभेतील रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जैन यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. बैठकीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मात्र, राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव जोरदार चर्चेत असतानाही अखेर त्यांच्या ऐवजी राजेंद्र जैन यांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महायुतीच्या अंतर्गत राजकारणासह सामाजिक समीकरणांचा विचार करून हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यास तत्त्वतः तयारी दर्शवली होती. मात्र, त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्या समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याची अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. या प्रस्तावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
भुजबळ राज्यसभेत गेल्यास येवला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता होती. त्यानंतर समीर भुजबळ यांना विधानसभा राजकारणात संधी मिळू शकली असती. मात्र, पहिल्याच कार्यकाळात त्यांना मंत्रिपद देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचे सांगितले जाते. अशा निर्णयामुळे जनमानसात घराणेशाहीबाबत नकारात्मक संदेश जाऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भुजबळ कुटुंबाला आधीच महत्त्वाची राजकीय संधी मिळाल्याचेही नेतृत्वाच्या चर्चेत नमूद झाल्याचे सांगितले जाते. पंकज भुजबळ यांना अलीकडेच विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच कुटुंबातील आणखी एका सदस्याला तत्काळ मंत्रिपद देणे योग्य ठरणार नाही, असे मत काही वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याचे बोलले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाचाही या निर्णयावर प्रभाव पडल्याची चर्चा आहे. येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले असले तरी महायुतीतील काही घटक पक्षांशी त्यांचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. विशेषतः समीर भुजबळ यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकेमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या नाराजीनाट्यामुळे काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी आणि संघटनात्मक पातळीवर सक्रिय असलेल्या राजेंद्र जैन यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यसभा उमेदवारीच्या राजकीय चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळाला असला तरी भुजबळांच्या नावाभोवतीचे प्रश्न आणि पडद्यामागील राजकारण यावर चर्चा अद्याप कायम आहे.