शेतकरी चिंतातुर; त्वरित दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
देशात यावर्षी अल निनोमुळे पावसाच्या प्रमाणात मोठी तूट दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यात याचा परिणाम मागील महिनाभरापासून सर्वत्र दिसून येत असून, त्यातही अकोला जिल्हा व पातूर तालुक्यात मागील तीस ते चाळीस दिवसांपासून पावसाअभावी सोयाबीन, तूर पिकांसह इतर पिके अक्षरशः जळून जात असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
यावर्षी मान्सून जरी देशात वेळेवर दाखल झाला असला, तरी त्यावर अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याने राज्यात अनेक भागात अजूनही खरीपच्या पेरण्या झाल्या नसल्याचे भयावह चित्र पाहावयास मिळत आहे.
अकोला जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिली; मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मोठा खंड पडला होता. आता ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पातूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जवळपास तीस ते चाळीस दिवस होत असूनसुद्धा पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
यावर्षी जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. त्यातच जमिनीची मशागत, महागडी खते, बियाणे, कीटकनाशके यावर शेतकऱ्यांनी जवळचा व व्याजाने पैसा आणून शेतीला लावला. आता सोयाबीन पीक फुलाच्या अवस्थेत असल्याने व पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने पावसाने मात्र उघाड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जिल्ह्यात अनेक भागात अद्याप पाऊस नाही आहे. पावसाअभावी सोयाबीन पिके सुकत चालली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी मात्र ढगाकडे आशेने पाहत चिंतेत आहे.
त्यामुळे शासनाने या बिकट परिस्थितीतून पीक विमा व इतर मदत शेतकऱ्यांना होईल यासाठी वेळ न घालवता त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. कारण आता पाऊस जरी आला तरी त्याचा फायदा पिकांना होणार नाही. जवळपास 90 टक्के सोयाबीन पिके गेली असल्याने उत्पादनात मोठी तूट येणार आहे.
या कालावधीत शासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक होते. जसे कृत्रिम पाऊस पाडणे, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे अशा सर्व शेतकऱ्यांना किमान पंधरा दिवस 24 तास थ्री फेज लाईन सुरू ठेवणे, पीक विमा 100 टक्के मंजूर करून दुष्काळी मदत वितरित करणे. मात्र या बाबीकडे गेल्या दोन महिन्यांपासून दुर्लक्ष केल्याने आता शेतकऱ्यांत तीव्र संताप निर्माण झाला आहे.
किमान आता तरी शासनाने शेतकऱ्यांचा संयम पाहू नये. यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात व मागील बाकी असलेले पीएम किसान, नमो शेतकरी सन्मान यांचे बाकी असलेले सर्व हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत व त्वरित दुष्काळ घोषित करून या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे.
प्रतिक्रिया
विनोद राऊत
शेतकरी संघटना, अकोला जिल्हा
मागील तीस ते चाळीस दिवसांपासून पातूर तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने पिके सुकत चालली असून उत्पादनात मोठी घट निर्माण होणार आहे. त्यामुळे तालुक्यासह सर्व जिल्ह्यात त्वरित दुष्काळ घोषित करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी किमान हा एक आठवडा तरी 24 तास थ्री फेज लाईट देण्यात यावी.
आगाबेग अनवर बेग
शेतकरी, मळसुर
माझ्या शेतातील सर्व सोयाबीन पाण्याअभावी जळून गेल्याने कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, हा विषय निर्माण झाला असून शासनाने त्वरित मदत द्यावी.
संतोष करे
शेतकरी, मळसुर
चांनी मंडळात मागील 40 दिवसांपासून पाऊस नसल्याने व तीव्र ऊन असल्याने पिके पूर्ण गेली आहेत. त्यातच ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था आहे, त्यांनासुद्धा चांनी सब स्टेशनमधून सुरळीत विद्युत पुरवठा मिळत नसल्याने पाणी असूनसुद्धा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. दिवसातून अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होत आहे.