वन्यजीव दुष्काळाची झळ

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

Wildlife Drought: यंदाच्या पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरालाही दुष्काळाची तीव्र झळ बसली आहे. त्याचा परिणाम केवळ शेतकरी आणि शेतीवरच नव्हे, तर जंगल परिसरातील वानरांसह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांवरही..

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

Wildlife Drought

 

लासोणा-बटनपूर-विजयनगर परिसरातील चित्र; शेतकऱ्यांच्या पिकांसह वन्यजीवांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर

देवणी (Wildlife Drought) : तालुक्यातील लासोणा, बटनपूर, विजयनगर परिसर पूर्वी पाण्याच्या उपलब्धतेमुळे हिरवाईने नटलेला आणि वन्यजीवांच्या वावराने गजबजलेला भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, यंदाच्या पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरालाही दुष्काळाची तीव्र झळ बसली आहे. त्याचा परिणाम केवळ शेतकरी आणि शेतीवरच नव्हे, तर जंगल परिसरातील वानरांसह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांवरही होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या भागात पूर्वी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने वानरांचे कळप तसेच विविध पक्षी आणि अन्य वन्यप्राणी सहजपणे दिसून येत होते. मात्र, सध्या पाणवठे आटत चालल्याने पाण्याच्या शोधात हे प्राणी गावोगावी भटकताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वन्यप्राणी आणि पक्षी हळूहळू जमा होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांची अवस्था तर यापेक्षाही बिकट
वन्यजीव पाण्यासाठी भटकत असताना शेतकऱ्यांची परिस्थिती त्याहून गंभीर झाली आहे. पाऊस येईल आणि पिके जोमाने उभी राहतील, या आशेवर शेतकऱ्यांनी पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने केलेला खर्च वाया जाण्याची वेळ आली आहे. सोयाबीन, तूर, मूग यासह विविध पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत काही शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून पिके वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र निसर्गापुढे आर्थिक ताकदही अपुरी पडत आहे. पैसाही गेला आणि पीकही गेले, अशी अवस्था अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.

मांजरा पट्ट्यात वन्यजीवांची गर्दी वाढतेय
मांजरा नदी परिसरातील काही गावांमध्ये अजूनही ठिकठिकाणी थोडेफार पाणी उपलब्ध आहे. या पाण्याच्या शोधात जंगली प्राणी, पक्षी आणि इतर जीव हळूहळू या परिसराकडे वळत आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत असल्याने आगामी काळात वन्यजीवांचा पाण्यासाठी मानवी वस्तीकडे होणारा वावर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वनविभागानेही पुढे येण्याची गरज

दुष्काळाच्या काळात शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची अपेक्षा व्यक्त होत असतानाच वन्यजीवांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्नही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. माणसांसाठी मदतीचा हात पुढे येत असताना वनविभागानेही वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे, पाण्याची टाकी आणि चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

पाण्याअभावी वन्यप्राणी गावाकडे येण्याचे प्रमाण वाढल्यास मानव-वन्यजीव संघर्षाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संकट वाढण्यापूर्वीच वनविभागाने लासोणा, बटनपूर, विजयनगरसह मांजरा पट्ट्यातील दुष्काळग्रस्त भागात वन्यजीवांसाठी पाणी व चाऱ्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुष्काळाची झळ माणसालाच नव्हे, तर मुक्या जीवांनाही बसत आहे. त्यामुळे शासन आणि वनविभागाने शेतकरी मदतीसोबतच वन्यजीवांच्या जगण्याचाही प्रश्न गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.

टैग्स: Wildlife Drought