राज्य सरकारचा 5 ऑक्टोबरचा आदेश
मुंबई : राज्य सरकारने आज, 5 ऑक्टोबर रोजी तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात संजय खंदारे, संजय यादव आणि वैष्णवी बी. यांचा समावेश आहे. यातील संजय खंदारे यांची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून वन विभागात नियुक्ती करण्यात आली असून, संजय यादव यांच्याकडे पर्यटन विभागाची सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय खंदारे यांच्याकडे वन विभाग
1996 च्या बॅचचे IAS अधिकारी संजय खंदारे आतापर्यंत पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार त्यांची आता वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
संजय यादव पर्यटन विभागाचे सचिव
2009 च्या बॅचचे IAS अधिकारी संजय यादव हे यापूर्वी समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. नव्या नियुक्तीनुसार त्यांच्याकडे आता पर्यटन विभागाच्या सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
वैष्णवी बी. यांची नागपूर विभागात नियुक्ती
2019 च्या बॅचच्या IAS अधिकारी वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदली आणि नियुक्तीचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.