गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवेचा शुभारंभ; दादर-एलटीटीवरील गर्दी कमी होण्यास मदत, पर्यटनालाही मिळणार चालना
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते सावंतवाडी रोडदरम्यान दैनंदिन एक्सप्रेस सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
आज दुपारी १२.५० वाजता सीएसएमटी येथून ही एक्सप्रेस रवाना झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री पीयूष गोयल, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, राहुल नार्वेकर, नितेश राणे आणि रितू तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
कोकणवासीयांची मुंबईहून थेट आणि नियमित रेल्वेसेवेची दीर्घकाळापासूनची मागणी या माध्यमातून पूर्ण झाली आहे. विशेषतः कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि पर्यटकांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार असून, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणाकडे जाणाऱ्या इतर गाड्यांवरील गर्दी कमी करण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या स्थानकांवर थांबणार?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी १२.५० वाजता सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०२.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
कोकणातील प्रवाशांना काय फायदा?
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि आसपासच्या भागासाठी दैनंदिन रेल्वे उपलब्ध झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नियमित सेवेचा फायदा व्यापारी तसेच पर्यटकांनाही होणार आहे.
सावंतवाडी, आंबोली, तारकर्ली तसेच गोवा सीमेलगतच्या पर्यटन क्षेत्राला या रेल्वेसेवेमुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील पर्यटनाला याचा फायदा होणार असून, रात्रीच्या प्रवासाची सुविधाही प्रवाशांना मिळणार आहे. गाडीच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळाही प्रवाशांच्या दृष्टीने सोयीच्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियमित सेवेचे वेळापत्रक नंतर जाहीर होणार
मध्य रेल्वेकडून कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या नव्या दैनंदिन एक्सप्रेसमुळे कोकण पट्ट्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला तसेच पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या गाडीच्या नियमित सेवेबाबतचा सविस्तर तपशील नंतर कळवण्यात येणार आहे.