गणेशोत्सवातील देखाव्यात अजित पवार यांच्या राजकीय प्रवासासोबत कौटुंबिक आठवणींचे दर्शन; जय पवारांनी केली बाप्पाची आरती
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आंबेगाव परिसरात उभारण्यात आलेला ‘अजित सृष्टी’ हा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक कार्यकर्ते युवराज बेलदरे यांनी साकारलेल्या या देखाव्यात अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीसोबत त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कामांचा आणि पवार कुटुंबाशी संबंधित आठवणींचा आढावा मांडण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी या देखाव्याला भेट दिली. यावेळी घडलेल्या भावनिक प्रसंगाने उपस्थित वातावरण काही क्षणांसाठी गहिवरून गेले.
जय पवार गणेशमूर्तीसमोर पोहोचले असता त्यांच्या हातात हळद, कुंकू आणि अक्षतांनी सजवलेली पूजेची तबकडी होती. मंडपाच्या परिसरात अजित पवार यांच्या बालपणापासूनचे तसेच पवार कुटुंबातील विविध आठवणींशी संबंधित जुने छायाचित्रे लावण्यात आली होती. जय पवार बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतानाच पार्श्वभूमीत अजित पवार यांच्या आवाजातील ऑडिओ ऐकू येऊ लागला.
Pune, Maharashtra: NCP leader Jay Ajit Pawar visited the Ganeshotsav display titled “Ajit Srishti” in Ambegaon on Tuesday at the request of party workers and became emotional while recalling memories of the late Ajitdada Pawar.
— IANS (@ians_india) September 22, 2026
(Source: DCM Sunetra Pawar) pic.twitter.com/dxn8gmfYjP
या ऑडिओमध्ये आईच्या छायाचित्राचा संदर्भ देत भावनिक संवाद करण्यात आला आहे. “आईचा फोटो पाहून खूप बरं वाटलं... आई रडत असते का रे अजून? तिला सांगा रडू नकोस म्हणून, तिचा अजित आजही तिच्याच जवळ आहे...” असे शब्द ऐकू येतात. त्यानंतर बालपणीच्या छायाचित्रासह पवार साहेब, सुप्रिया, जय आणि पार्थ यांच्याशी निगडित आठवणींचाही उल्लेख या ऑडिओमध्ये करण्यात आला आहे.
वडिलांच्या आवाजातील हा संवाद ऐकताच जय पवार काही क्षण स्तब्ध झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. भावनाविवश झालेल्या जय पवारांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी हाताने डोळे पुसत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवत त्याच भावूक अवस्थेत गणपती बाप्पाची आरती केली.
हा प्रसंग पाहताना मंडपात उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नागरिकही भावूक झाले. देखावा साकारण्यात पुढाकार घेणारे युवराज बेलदरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाच्या आठवणी मांडल्या आहेत. राजकीय विषयांबरोबरच कुटुंबातील आठवणींना स्थान देण्यात आल्याने या देखाव्याला वेगळी भावनिक किनार मिळाली आहे. जय पवार भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, या प्रसंगाची चर्चा होत आहे.