मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, रायचूरमार्गे बंगळुरू कनेक्टिव्हिटी; प्रस्तावित ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार
मुंबई आणि बंगळुरू दरम्यान जलद आणि आरामदायी रेल्वे प्रवासाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई-सीएसएमटी ते KSR बंगळुरू दरम्यान प्रस्तावित स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसचा मार्ग पुणे-सोलापूरमार्गे ठेवण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे सोलापूरला थेट फायदा होणार असला, तरी मिरज, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगावी, हुबळी, धारवाड आणि दावणगेरे या भागांतील प्रवाशांना या गाडीची थेट सेवा मिळणार नाही.
या स्लीपर वंदे भारतच्या मार्गावरून यापूर्वी मिरज-बेळगावी-हुबळी मार्गाचीही चर्चा होती. मात्र, सध्याच्या प्रस्तावानुसार पुणे-सोलापूर कॉरिडॉरला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील काही महत्त्वाच्या शहरांना या नव्या जलद रेल्वे कनेक्टिव्हिटीपासून वंचित राहावे लागणार असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा?
प्रस्तावित मार्गानुसार ही ट्रेन KSR बंगळुरू आणि मुंबई CSMT दरम्यान धावणार आहे. तिच्या मार्गावर अनंतपूर, गुंतकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण या स्थानकांवर थांबे प्रस्तावित आहेत.
या मार्गाचे एकूण अंतर सुमारे 1,100 किलोमीटरपेक्षा अधिक असून मुंबई-बंगळुरू प्रवास सुमारे 16 तासांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्याच्या उपलब्ध प्रस्तावानुसार या सेवेमुळे रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत प्रवाशांना गंतव्यस्थानी पोहोचता येणार आहे.
आठवड्यातून सहा दिवस सेवा
रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावानुसार ही स्लीपर वंदे भारत आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. उपलब्ध प्रस्तावित वेळापत्रकानुसार बंगळुरूहून मुंबईकडे जाणारी ट्रेन क्रमांक 27652 रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1:50 वाजता CSMT येथे पोहोचण्याची शक्यता आहे. ही सेवा सोमवारी नसण्याची शक्यता आहे.
तर मुंबई CSMTहून बंगळुरूकडे जाणारी ट्रेन क्रमांक 27651 रात्री 10:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 2:50 वाजता KSR बंगळुरूला पोहोचण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईकडून जाणारी सेवा मंगळवारी वगळता आठवड्यातील सहा दिवस चालण्याची शक्यता आहे.
रेल्वेकडून अंतिम वेळापत्रक आणि व्यावसायिक सेवा सुरू करण्याची अधिकृत तारीख अद्याप स्वतंत्रपणे जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे सध्या समोर आलेल्या वेळा प्रस्तावित वेळापत्रक म्हणूनच पाहाव्या लागतील.
स्लीपर कोचमध्ये कोणते वर्ग?
ही पूर्णपणे वातानुकूलित स्लीपर वंदे भारत असणार आहे. लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी 3-Tier AC, 2-Tier AC आणि 1-Tier AC/First Class अशा श्रेणी उपलब्ध असण्याची माहिती आहे.
या मार्गासाठी रेल्वेने दोन Vande Bharat Sleeper रेकची व्यवस्था केली असल्याचेही वृत्त आहे.
तिकीट किती असणार?
या ट्रेनच्या तिकिटांचे अधिकृत भाडे अद्याप जाहीर झालेले नाही. सध्या चर्चेत असलेल्या अंदाजानुसार 3-Tier ACसाठी सुमारे 2,200 ते 2,500 रुपये, 2-Tier ACसाठी 3,200 ते 3,600 रुपये आणि First ACसाठी 4,000 ते 4,500 रुपये भाडे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, अंतिम भाडे रेल्वेकडून अधिकृत भाडेपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सोलापूरला फायदा, पश्चिम महाराष्ट्रात नाराजी
मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरून ही सेवा सुरू झाल्यास या भागातील प्रवाशांना बंगळुरूशी जलद स्लीपर रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दुसरीकडे, मिरज, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर तसेच बेळगावी, हुबळी, धारवाड आणि दावणगेरे या शहरांमधून या मार्गावर ट्रेन वळवण्याची मागणी होत होती.
मात्र सध्याच्या प्रस्तावात पुणे-सोलापूर मार्ग निश्चित झाल्याने या शहरांतील प्रवाशांच्या अपेक्षांना धक्का बसल्याचे चित्र आहे.