राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा हालचालींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याच्या वृत्तानंतर राज ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) September 26, 2026
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर…
उद्धव ठाकरे यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत समोर आलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण वादात कॉकरोच जनता पार्टीनेही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात भूमिका घेत 48 तासांत राजीनामा देण्याचे अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे.
राज ठाकरे यांनी अलीकडील वक्तव्यांमध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करत एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची तसेच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एकत्रितपणे आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या प्रस्तावित महामोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काय आहे पोस्ट?
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत. अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कॉकरोचचं आंदोलन
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी कालच ट्विट करून ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिला होता. 2 ऑक्टोबरच्या आधी राजीनामा द्या, अन्यथा आम्ही मुंबईत मोठं आंदोलन करू, असा इशारा दीपके यांनी दिला होता. दीपके यांनी मुंबईतच नव्हे तर हे आंदोलन देशातील इतर शहरांमध्ये नेणार असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे आधीच नीटच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात देशातील जनतेत असंतोष असतानाच आता ज्ञानेश कुमार प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकार ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करणार, त्यांना जायला सांगणार की त्यांना अभय देणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.