मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीडहून पुण्याच्या दिशेने पहिली रेल्वे रवाना; बीडच्या कनेक्टिव्हिटीला नवी जोड
बीड : मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला पुण्याशी थेट रेल्वेने जोडण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचा टप्पा पार पडला. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड-पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर गाडी बीडहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर रोजी बीडमधून पुण्यासाठी थेट रेल्वे धावण्यास सुरुवात झाली. यापूर्वी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू झाली होती. त्यानंतर आता बीड-पुणे रेल्वेसेवा सुरू झाल्याने बीडच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.
आजचा हा ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आदरणीय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित!
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) September 17, 2026
दादांनी बीडकरांना दिलेला शब्द आज पूर्ण झाला… बीड ते पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ!#Beed #PuneRailway pic.twitter.com/xeFPw1f5xr
यावेळी सुनेत्रा पवार यांनी बीडमधील रेल्वे प्रवासाच्या आठवणी सांगत नागरिकांना नव्या रेल्वेसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. बीडकरांना पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी पूर्वी येणाऱ्या अडचणी या रेल्वेमुळे कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या रेल्वेसेवेमुळे बीडमधील व्यापारी वर्गालाही फायदा होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बीड-पुणे रेल्वे प्रकल्पामागे अजित पवार यांचे स्वप्न आणि प्रयत्न असल्याचा उल्लेख सुनेत्रा पवार यांनी केला. सरकारकडून उपलब्ध झालेला निधी आणि अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षीच्या बीड-अहिल्यानगर रेल्वे शुभारंभाच्या वेळी अजित पवार यांनी पुढील वर्षी बीडहून थेट पुण्याला प्रवास करता येईल, असा शब्द दिला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
अजित पवार यांनी बीडकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रसंग आपल्याला मिळाला, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. बीडच्या विकासासोबतच जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी मजबूत करणे हा आपला प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेल्या बीड ते पनवेल थेट रेल्वेप्रवासाच्या अपेक्षेचाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी उल्लेख केला. बीडच्या पालकमंत्री म्हणून आवश्यक कामांसाठी अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अजित पवार यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीडच्या नागरिकांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. बीड आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
रेल्वे बोर्डाने पुणे-बीड-पुणे एक्सप्रेसच्या नियमित दैनंदिन सेवेला मंजुरी दिली असून, उद्घाटनासाठी १७ सप्टेंबर रोजी बीडहून विशेष गाडी रवाना करण्यात आली.