हळद-पुणे आणि सोलापूर-मुंबई मार्गावरील गाड्या आता दररोज; १८ ऑगस्टपासून नियमित एक्सप्रेसचा दर्जा
लातूर : लातूरहून पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. हळद आणि सोलापूर-मुंबई या दोन गाड्या आता नियमित एक्सप्रेस गाड्या म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी या गाड्या आठवड्यातील ठरावीक दिवशीच धावत होत्या. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या आणि मार्गावरील गर्दी लक्षात घेता या दोन्ही गाड्या आता दररोज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हडपसर-हरंगुळ-लातूर तसेच सोलापूर-मुंबई मार्गे बिदर-उदगीर-लातूर-धाराशिव-पुणे या दोन गाड्या यापूर्वी आठवड्यातील काही दिवस चालत होत्या. या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने या गाड्या नियमित करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होती.
रेल्वे प्रशासनाने आता या दोन्ही गाड्यांना नियमित एक्सप्रेसचा दर्जा दिला असून, १८ ऑगस्टपासून त्या एक्सप्रेसच्या स्वरूपात दररोज धावण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्यानंतर प्रवाशांना अतिरिक्त भाडे द्यावे लागणार नाही. सामान्य एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरानुसारच या रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.
लातूर भागातील प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता या गाड्या नियमित करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. रेल्वे प्रशासनासोबतच लातूरचे खासदार डॉ. काळगे यांच्या प्रयत्नांनंतर अखेर या दोन्ही गाड्या नियमित एक्सप्रेस म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत.