ऑगस्टमध्ये ३७८ गुन्हे दाखल, ४५९ आरोपी अटकेत; ८०.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी ऑगस्ट २०२६ मध्ये व्यापक धडक मोहीम राबविली. दारूबंदी, जुगार, गोवंश तस्करी, अमली पदार्थ, रेती चोरी यासह विविध अवैध कारवायांवर कारवाई करत एकूण ३७८ गुन्हे दाखल करून ४५९ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत ८० लाख ६८ हजार ६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, दारूबंदी व हातभट्टी दारूविरोधात सर्वाधिक ३५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात ५० लाख ३१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दारूच्या पाच कारवायांमध्ये २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ८८ प्रकरणांत १ कोटी ५ लाख ११ हजार ६११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोवंश तस्करीविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेत १८ कारवायांमध्ये १७९ जनावरे आणि ३१ वाहने ताब्यात घेतली. या कारवाईतील जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ९६ लाख २६ हजार रुपये आहे. अमली पदार्थविरोधी मोहिमेत ५७ कारवाया करून १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच रेती चोरीच्या आठ प्रकरणांत १ कोटी ५७ लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतूक नियमभंगावरही कठोर कारवाई
जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी मोठी मोहीम राबविली. ऑगस्टमध्ये २२ हजार १०२ प्रकरणे दाखल करून १ कोटी ९० लाख ८९ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, दुचाकीवर तिप्पट सीट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही यश
दरोडा, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यातही पोलिसांना यश आले. दरोड्याच्या चार गुन्ह्यांत १ लाख ५३ हजार रुपये, घरफोडीच्या १२ गुन्ह्यांत ४ लाख ८४ हजार ५२५ रुपये, तर चोरी व मोटारसायकल चोरीच्या ३७ गुन्ह्यांत तब्बल ७४ लाख २९ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हरविलेल्या ९५ व्यक्तींचा शोध
गुन्हेगारी नियंत्रणासोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही पोलिसांनी प्राधान्य दिले. ऑगस्ट महिन्यात हरविलेल्या ९५ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. यामध्ये १६ मुली, ५ मुले, ४८ महिला आणि २६ पुरुषांचा समावेश आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईला वेग
सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत तीन कारवाया करण्यात आल्या. तसेच ६ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा दबाव वाढला आहे.
‘तुमची सुरक्षा – आमची जबाबदारी’ या भूमिकेतून चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अवैध धंदे, अमली पदार्थ, गोवंश तस्करी, रेती चोरी आणि वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.