गुजरात ATS आणि भारतीय तटरक्षक दलाची संयुक्त कारवाई; ‘आझाद’ बोटीतून जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये
अरबी समुद्रात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या नेटवर्कवर कारवाई केली आहे. पश्चिम लक्षद्वीपजवळ करण्यात आलेल्या या मोहिमेत ‘आझाद’ नावाच्या बोटीतून तब्बल 526 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाईदरम्यान बोटीवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.

कारवाईनंतर ‘आझाद’ बोट कडक सुरक्षा व्यवस्थेत गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव तालुक्यात असलेल्या नार्गोल समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आली. समुद्रातील भरतीची योग्य वेळ साधून गुजरात मरीन पोलिसांच्या नार्गोल पथकाने ही बोट नार्गोल जेट्टीवर आणली. सध्या बोट परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

14 सप्टेंबरपासून सुरू होता तपास
गुजरात ATSच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारवाईची पार्श्वभूमी 14 सप्टेंबरपासून तयार झाली होती. एका नायजेरियन नागरिकाने गुजरातमधील एका वॉन्टेड आरोपीची भेट घेत भारतात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची खेप पाठवण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय यंत्रणांनी इराणमधील कोणार्क बंदरातून निघालेल्या बोटीवर लक्ष केंद्रित केले.

इराणहून निघाल्यानंतर ही बोट पाकिस्तानातील ग्वादर बंदरात पोहोचली. याच ठिकाणी पाच पाकिस्तानी नागरिक बोटीवर चढले. त्यानंतर ही बोट भारताच्या दिशेने रवाना झाली.
VIDEO | Nargol, Valsad: The boat seized during the Indian Coast Guard and Gujarat ATS operation, which led to the seizure of 526 kg of drugs worth an estimated Rs 3,000 crore in the international market, was brought to Nargol shore under tight security. The boat, allegedly… pic.twitter.com/Jwn82f7jQ1
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2026
गुजरातऐवजी कोचीमार्गे ड्रग्ज पोहोचवण्याचा प्रयत्न
सुरुवातीच्या नियोजनानुसार अमली पदार्थांची खेप गुजरातच्या किनारपट्टीवर उतरवण्याचा तस्करांचा डाव होता. मात्र भारतीय तपास यंत्रणांची नजर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.
नव्या योजनेनुसार ही खेप लक्षद्वीपमार्गे केरळमधील कोची येथे नेण्यात येणार होती. त्यानंतर तामिळनाडूमार्गे ड्रग्ज पंजाबपर्यंत पोहोचवण्याची योजना असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र दुसऱ्या बोटीमध्ये अमली पदार्थ हस्तांतरित करण्यापूर्वीच भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात ATSने समुद्रात कारवाई करत बोट रोखली.
🎥 EN LA INDIA DECOMISAN DROGA AL CÁRTEL - LA DROGA SE MUEVE POR TODO EL MUNDO
— Contacto Revista (@ContactoRevist) October 1, 2026
Guardacostas de India y el ATS de Gujarat interceptan un buque de contrabando de narcóticos en el mar Arábigo, arrestan a cinco tripulantes paquistaníes y trasladan el cargamento a Mumbai. pic.twitter.com/peoLjkAJbS
सुमारे 15 दिवसांची समुद्री मोहीम
या संपूर्ण कारवाईसाठी भारतीय यंत्रणांनी सुमारे 15 दिवस समुद्रात मोहीम राबवली. अखेर ‘आझाद’ बोट अडवून त्यातून 526 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली.
या तस्करीमागे भारतातील नेमके कोणते नेटवर्क कार्यरत होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून केला जात आहे. जप्त केलेली बोट नार्गोल समुद्रकिनाऱ्यावर ठेवण्यात आली असून तिच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.