हिंगोली (Hingoli Drains Cleaning) : पावसाळ्यापूर्वी मोठ्या गाजावाजात करण्यात आलेल्या नाला सफाई मोहिमेची हवा निघाली आहे. हिंगोली शहरातील प्रसिद्ध जलेश्वर तलावाकडे जाणार्या मुख्य नाल्याची अवस्था पाहता प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. सध्या या नाल्यातून जाणार्या पाण्यावर जागोजागी कचराच कचरा तरंगताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून होणार्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मात्र हा प्रवाह स्वच्छ पाण्याचा नसून प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, थर्माकोल, घरगुती कचरा आणि गाळाने भरलेला आहे. नाल्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर कचर्याचा जाड थर साचला असून त्यामुळे पाणी पुढे जाण्यास अडथळा होत आहे. याच कचर्यासह सर्व घाण थेट जलेश्वर तलावात मिसळत आहे. नगर परिषदेकडून एप्रिल आणि मे महिन्यात नाले सफाईसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता.
जेसीबी आणि मजुरांद्वारे सफाई करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जलेश्वर तलावाकडे जाणार्या या महत्वाच्या नाल्याकडे कोणीही फिरकले नसल्याचे चित्र आहे. कागदावर सफाई झाली, परंतु प्रत्यक्षात एकही टन कचरा उचलला गेला नाही हे आता स्पष्ट झाले आहे. जलेश्वर तलाव हे शहराचे भूषण असून धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. अशा तलावात जर नाल्यातील सर्व कचरा आणि सांडपाणी सोडले गेले तर तलावाचे पाणी दूषित होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन दिले होते. मात्र तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
आता पावसाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात जर जोराचा पाऊस झाला तर हा सर्व कचरा एकाच वेळी तलावात जाऊन तलावाची पूर्ण वाट लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या नाल्यातील कचरा उचलून जळेश्वर तलाव वाचवावा अशी मागणी हिंगोलीतील नागरिक करत आहेत. अन्यथा पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली असे सांगणार्या अधिकार्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागेल.