पाच तालुके दुष्काळग्रस्त करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्याचे आश्वासन
सेनगाव (Minister Narhari Zirwal) : तालुक्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी १६ सप्टेंबर बुधवारी विविध गावांना भेटी देत जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य उपकेंद्रे तसेच शेतातील पिकांची पाहणी केली. दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना, परिस्थितीची वस्तुस्थिती वरिष्ठ प्रशासनासमोर मांडून जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी नाका कनेरगाव, वायचाळ, पिंपरी, सवना, गोरेगाव आणि हाताळा येथे भेटी देऊन जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली. यासोबतच संबंधित ग्रामपंचायत कार्यालये व आरोग्य उपकेंद्रांचीही पाहणी करून स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली.
मनास पिंपरीमार्गे माहेरखेडा मार्गावरील शेतांमध्ये जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. पावसाचा खंड, पिकांची झालेली स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी तसेच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील परिस्थिती दुष्काळजन्य असल्याचे सांगत, उपलब्ध वस्तुस्थिती व अहवाल वरिष्ठ पातळीवर मांडून दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
या दौऱ्यात पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ठोंबरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशावरी काळे, महिला व समाजकल्याण विभागाच्या वाकोडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, माधव कोकाटे यांच्यासह महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.