Godavari River

गोदावरी धोक्याच्या उंबरठ्यावर; रामकुंड जलमय, गंगापूर धरणातून 13 हजार क्यूसेक विसर्ग

नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गोदावरी धोक्याच्या उंबरठ्यावर; रामकुंड जलमय, गंगापूर धरणातून 13 हजार क्यूसेक विसर्ग

त्र्यंबकेश्वरमध्ये 24 तासांत 194 मिमी पाऊस; सायंकाळपर्यंत 24 हजार क्यूसेक प्रवाहाचा अंदाज, नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचा इशारा

नाशिक : नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड परिसर पाण्याखाली गेला असून तेथील मंदिरे आणि रामसेतू पूल जलमय झाले आहेत. प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून सायंकाळपर्यंत गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरण 97 टक्के भरले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांमधून येणारे पाणी गंगापूर धरणात दाखल होत असल्याने तेथून सध्या 13 हजार क्यूसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी रामकुंड परिसरात पोहोचण्यासाठी सुमारे पाच तास लागतात.

दरम्यान, पावसामुळे येणारे अतिरिक्त पाणी आणि धरणातील विसर्ग यामुळे होळकर पुलाखालून सायंकाळपर्यंत सुमारे 24 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा प्रवाह होण्याचा अंदाज आहे. होळकर पुलाजवळ 19 हजार क्यूसेक विसर्ग झाल्यानंतर गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते. त्यामुळे सराफ बाजार आणि भांडी बाजार परिसरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पूरस्थितीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांमधून येणारे पाणी गंगापूर धरणात साठवले जात असून तेथून सोडलेले पाणी सुमारे पाच तासांनी रामकुंडात पोहोचते. गंगापूर धरण सध्या 97 टक्के भरले असून इशारा पातळी 13 हजार क्यूसेक आणि धोक्याची पातळी 19 हजार क्यूसेक आहे. ही मर्यादा ओलांडल्यास भांडी बाजार परिसरात पाणी साचण्याचा धोका वाढतो.

त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या 24 तासांत तब्बल 194 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सायंकाळनंतर नदीतील पाणीपातळी वाढण्याची शक्यता कायम आहे. नाशिकच्या इतिहासात यापूर्वी 65 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्याची नोंद आहे. सध्याची परिस्थिती तितकी गंभीर नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. तसेच काल त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या.

दरम्यान, सुरगाणा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. रात्री नाल्यात पाय घसरून पडल्याने मोतीराम चव्हाण (वय 42) यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे गुजरातमधील वलसाड येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवून सुखरूप बाहेर काढले.

महापालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हाय अलर्टवर असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. तसेच गोदावरी नदीकाठावरील दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांनी सायंकाळनंतर खबरदारी घ्यावी, पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित सामग्री

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

Sep 28, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026
परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 27, 2026