मुंबईसह काही भागांत मोसमी वारे परतले; देशात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या ८७.४ टक्के पाऊस, १२.६ टक्के तूट
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरू लागल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतण्यासाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता असून, त्यानंतर राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होऊ शकतो.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांतून मोसमी वारे आधीच माघारी गेले आहेत. आता मुंबईसह अन्य भागांतूनही मान्सूनची माघार सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील उर्वरित भागांतूनही मान्सून परतण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मान्सूनच्या माघारीमुळे आगामी काळातील पावसाच्या स्थितीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचे प्रमाण आणि त्याचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे.
दोन दिवसांत १३ राज्यांतून मान्सून माघारी
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत देशातील १३ राज्यांमधून मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात, मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, संपूर्ण जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असून केरळमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा देशात १२.६ टक्के पावसाची तूट
जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या ८७.४ टक्के पावसाची नोंद झाली. या कालावधीत देशात साधारणपणे ८६८.६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात ७५९.४ मिलिमीटर पाऊस झाला.
२००१ नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभरात पावसाची १२.६ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे.