प्रधानमंत्री आवास योजनेतील मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी मागितली लाच; बनेश्वर मंदिराजवळ कारवाई
बीड : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील बनसारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गोविंद सोपान गोरे (वय ५०, रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड) असे कारवाई करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी गोरे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. ३० मस्टरसाठी प्रत्येकी १०० रुपये, याप्रमाणे एकूण ३ हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकारानंतर तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मागणीची पडताळणी केली. त्यानंतर संबंधिताला लाच स्वीकारताना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून बनेश्वर मंदिराजवळ तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने गोविंद गोरे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
या कारवाईची माहिती समोर आल्यानंतर बनसारोळा ग्रामपंचायत परिसरासह ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली. शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने केलेल्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीडचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.