दिल्लीमध्ये २८ सप्टेंबरला कारवाई; Foreigners Division आणि Payroll and Accounts Office मधील अधिकाऱ्यांचा समावेश
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील दोन अधिकाऱ्यांवर FCRA अर्थात Foreign Contribution Regulation Act अंतर्गत कामांसाठी लाच मागितल्याचा आरोप झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एखाद्या संस्थेची FCRA नोंदणी करून देणे आणि परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यापैकी एक वरिष्ठ अधिकारी असून तो MHA Foreigners Division मध्ये कार्यरत आहे. दुसरा अधिकारी Payroll and Accounts Office मध्ये कार्यरत आहे. यापूर्वी त्याने Foreigners Division मध्येही काम केले होते.
प्राथमिक तपासादरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांचा काही संस्थांशी संपर्क असल्याचे आढळून आले आहे. FCRA अंतर्गत नोंदणी मिळवून देणे तसेच लायसन्स रिन्यू करण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात संबंधित संस्थांकडून लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसोबतच विभागीय पातळीवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर गृह मंत्रालयाने FCRAशी संबंधित प्रक्रियेबाबतही महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. FCRA अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व सेवा अधिकृत FCRA पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहेत. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाला, एजंटला किंवा अन्य व्यक्तीला अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलेले नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे FCRAशी संबंधित कामांसाठी अशा व्यक्तींच्या संपर्कात येताना नागरिक आणि संस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, FCRA दुरुस्ती विधेयक २०२६ मुळेही या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या विधेयकातील प्रस्तावित तरतुदी आणि त्यामागील कारणांवर ३१ सदस्यीय संयुक्त संसदीय समितीसमोर गृह मंत्रालय तसेच कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली आहे. भाजप खासदार संजय जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही संयुक्त संसदीय समिती विधेयकावर काम करत आहे.