गंगा नदीकाठी नत्था पुरवा गावाजवळ दुर्घटना; ट्विन-इंजिन विमानातील दोन्ही पायलट जखमी, अपघाताच्या कारणाचा तपास सुरू
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी दुपारी प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेल्या विमानाला भीषण अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात अचानक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर विमान नियंत्रणाबाहेर जाऊन गंगा नदीकाठावरील नत्था पुरवा गावाजवळ कोसळले. या दुर्घटनेनंतर परिसरात मोठा आवाज आणि धुराचे लोट पसरल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली.
प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान ट्विन-इंजिन, म्हणजेच दोन इंजिन असलेले होते. या विमानात दोन पायलट असल्याची माहिती आहे. उड्डाणानंतर अचानक स्फोट झाल्यानंतर विमानाचा ताबा सुटला आणि ते जमिनीवर आदळले. अपघातानंतर विमानाचे अवशेष घटनास्थळी विखुरलेले दिसून आले. दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.
एका पायलटचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
या अपघातात एका पायलटचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा पायलट गंभीर जखमी झाला आहे. विमानाच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या जखमी पायलटला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
VIDEO | Kanpur, Uttar Pradesh: Trainer aircraft crashes near Ganga banks. Rescue teams at the crash site. More details are awaited.#KanpurNews #KanpurAirplaneCrash
— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/eEbjXkZrsh
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विमान कोसळल्याचे वृत्त परिसरातील गावांमध्ये वेगाने पसरल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
विमान दुर्घटनेमागचे नेमके कारण काय?
दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. उड्डाणादरम्यान विमानात स्फोट कशामुळे झाला, तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा अन्य कोणत्या कारणामुळे विमानाचा ताबा सुटला, याचा शोध घेतला जात आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार विमान दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तपासातूनच या अपघातामागील वास्तविक कारण समोर येणार आहे.