बार्शीटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यातील काही गावांच्या परिसरात शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या गडद अंधारात चार ते पाच लाल-हिरव्या रंगांचे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आले. सोनगिरी, महागाव, पाटखेड, चिंचोली, मांगुळ, पुनोती, राजनखेड, वाघजाळी, वरखेड आदी गावांच्या परिसरात ड्रोनने इकडून तिकडे घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ड्रोनद्वारे रेकी करून चोरीचा प्रयत्न केला जात आहे की घातपाताचा काही प्रयत्न आहे, याबाबत गावांमध्ये उलटसुलट चर्चा आणि अफवा सुरू आहेत. यामुळे जनता कमालीची भयभीत झाली असून, अनेकांनी चोरीच्या धसक्याने रात्र जागून काढल्याचे सांगितले जात आहे.
ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती रात्री पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पोलीस वाहनातून सोनगिरी, पाटखेड आदी गावांना रात्री भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी बार्शीटाकळी तालुक्यातील सोनगिरी तसेच इतर गावांमध्ये घरफोडीच्या घटना आणि विविध प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या घटनेमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचीही चर्चा
दरम्यान, शासनाकडून वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती जनतेला न देता रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या ड्रोनचा नेमका उद्देश काय होता, याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.
याबाबत पोलीस अधिकारी आनंद कांदे आणि तहसीलदार कापशीकर यांच्याशी चर्चा केली असता, चौकशी करून माहिती कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दवंडीतून चोरांपासून सावधानतेचा इशारा
तालुक्यातील पाटखेड गावात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ड्रोनद्वारे पाहणी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, घराबाहेर नवीन दुचाकी ठेवू नये तसेच चोरीच्या घटनांपासून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा दवंडीच्या माध्यमातून देण्यात आला.
अगोदरच पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या घालत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे मत महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोरे यांनी व्यक्त केले.