नागोया/ जपान (Asian Games 2026) : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी भारताने शानदार कामगिरी करत तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात भारताने तीन सुवर्णपदके जिंकली, तर नेमबाजीच्या मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली. या कामगिरीमुळे भारताची एकूण पदकसंख्या 59 वर पोहोचली असून, त्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताने पदकतालिकेत इराणला मागे टाकत सातवे स्थान मिळवले आहे.
दिवसाची सुरुवात भारतीय महिला कम्पाऊंड तिरंदाजी संघाच्या सुवर्णपदकाने झाली. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांच्या संघाने चीनचा पराभव करत विजेतेपद कायम राखले. त्यानंतर चिकिथा तनिपार्थी आणि साताऱ्याचा साहिल जाधव या जोडीने मिश्र कम्पाऊंड सांघिक प्रकारात दक्षिण कोरियाचा शूट-ऑफमध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या (Asian Games 2026) विजयासोबत भारताला लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी कोटा स्थानही मिळाले.
तिरंदाजीत सुवर्णधमाका
पुरुषांच्या कम्पाऊंड सांघिक प्रकारात साहिल जाधव, कुशल दलाल आणि गणेश मणी रत्नम यांच्या भारतीय संघाने चीनवर 238-237 असा निसटता विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे भारताने कम्पाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. मिश्र सांघिक प्रकारातील विजयामुळे साहिल जाधवने या स्पर्धेत आपली दुसरी सुवर्णकामगिरी नोंदवली. त्याच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला.
नेमबाजीत नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांचे सुवर्ण
नेमबाजीच्या मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनाई या भारतीय जोडीने सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला. अंतिम फेरीत भारतीय जोडीने 34 गुणांची नोंद करत आशियाई विक्रम प्रस्थापित केला. कतारने 32 गुणांसह रौप्य, तर चीनने 23 गुणांसह कांस्यपदक मिळवले. या विजयासह मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. पंतप्रधान कार्यालयानेही नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय जोडीने आशियाई विक्रमासह या प्रकारातील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकल्याचे नमूद केले आहे.
भारताची पदकसंख्या 59 वर
अकराव्या दिवशी चार सुवर्णपदके मिळाल्याने (Asian Games 2026) भारताची एकूण पदकसंख्या 59 वर पोहोचली आहे. यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्यपदकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे भारताने पदकतालिकेत इराणला मागे टाकत सातवे स्थान मिळवले आहे. तिरंदाजी आणि नेमबाजीतील या दमदार कामगिरीमुळे भारताच्या पदकसंख्येत मोठी भर पडली असून, उर्वरित स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.