28 वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक!
नवी दिल्ली/ नागोया (Mirabai Chanu Won Silver Medal) : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने अखेर एशियन गेम्समधील पदकाचे स्वप्न साकार केले. आयची-नागोया एशियन गेम्समध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने रौप्यपदक पटकावले. तिने स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो असे एकूण 198 किलो वजन उचलले. उत्तर कोरियाच्या री सोंग गुमने 215 किलो वजनासह सुवर्णपदक मिळवले.
या पदकासह मीराबाईने (Mirabai Chanu) केवळ स्वतःच्या कारकिर्दीतील एक अपूर्ण राहिलेली कामगिरी पूर्ण केली नाही, तर एशियन गेम्समधील भारतीय वेटलिफ्टिंगचा 28 वर्षांचा पदक दुष्काळही संपवला. भारताला यापूर्वी 1998 च्या बँकॉक एशियन गेम्समध्ये (Asian Games 2026) कर्णम मल्लेश्वरी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवून दिले होते. त्यानंतर भारताला या क्रीडा प्रकारात एशियन गेम्समध्ये पदक मिळाले नव्हते.
अखेर पूर्ण झाले एशियन गेम्सचे पदक
मीराबाईने (Mirabai Chanu) 2014 च्या इंचियोन एशियन गेम्समधून आपल्या मोहिमेला सुरुवात केली होती. त्या वेळी तिला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2018 च्या जकार्ता एशियन गेम्समध्ये दुखापतीमुळे ती सहभागी होऊ शकली नाही. त्यानंतर २०२३च्या हांगझोऊ एशियन गेम्समध्ये ती पदकाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती; मात्र दुखापतीनंतर 191 किलो वजनासह चौथ्या स्थानावर राहिली. मीराबाईच्या नावावर यापूर्वीच ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन सुवर्णपदके आहेत. मात्र एशियन गेम्सचे (Asian Games 2026) पदक तिच्या कारकिर्दीत अद्याप बाकी होते. नागोयातील रौप्यपदकाने ही उणीवही भरून काढली.
We are so proud of our @mirabai_chanu who is making India proud time and again in Weightlifting events 🇮🇳 https://t.co/Ujl2DnqNkX pic.twitter.com/VPkVYxW7h6
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 23, 2026
मनू भाकरचे पदक हुकले
दरम्यान, भारताची नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पदक मिळवू शकली नाही. पात्रता फेरीत 579 गुण आणि 20 इनर-10सह तिने तिसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत 181.1 गुणांसह ती पाचव्या स्थानावर राहिली. चौथ्या एलिमिनेशन टप्प्यानंतर तिचे आव्हान संपुष्टात आले. 10 मीटर एअर पिस्तूलच्या सांघिक प्रकारातही भारतीय संघाला पदक मिळाले नाही. भारत चौथ्या स्थानावर राहिला. आता मनू भाकरचे लक्ष 25 मीटर पिस्तूल स्पर्धेकडे असेल, जिथे तिला पुन्हा पदकासाठी संधी मिळणार आहे.