सूरज-संजनाच्या आयुष्यात चिमुकल्या लेकीचे आगमन; हॉस्पिटलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण याच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सूरज आणि संजना आई-बाबा झाले आहेत. संजनाने गोंडस मुलीला जन्म दिला असून, त्यांच्या घरी चिमुकल्या लेकीचे आगमन झाले आहे. ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमधून समोर आली असून, चाहत्यांकडून सूरज-संजनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सूरज चव्हाण बाबा होणार असल्याची माहिती त्याची मानलेली बहीण आणि मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने यापूर्वी दिली होती. जान्हवीने संजनाची चोरओटी भरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये संजना आपल्या घरी राधेचे आगमन होणार असल्याचा आनंद व्यक्त करताना दिसली होती.
आता संजनाची डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी झाल्याचा आनंद सूरज आणि संजनाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळतो. सूरज पत्नी संजनाला प्रेमाने जवळ घेत तिच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सूरज आणि संजना आई-बाबा झाल्याची माहिती समोर येताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांकडून दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दरम्यान, सूरज आणि संजना आपल्या लेकीचे नाव काय ठेवणार, याची उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांसह प्रेक्षकांनाही लागली आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह २९ नोव्हेंबर २०२५ रोजी बारामतीत शाही पद्धतीने पार पडला होता. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सूरजची ओळख आहे. ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.