कोरेगाव : जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, कोरेगाव येथील अवस्था बिकट झाली आहे. शाळेची पटसंख्या 180 च्या वर असून, वर्ग एक ते चारसाठी शिक्षक संख्या 4 आहे. त्यात एक मुख्याध्यापक असून तेही प्रभारी आहेत.
शाळेतील मुलांना मिळणारे जेवण पडक्या जुन्या शाळेच्या इमारतीतील खोलीत बनविले जाते. या खोलीच्या सभोवताल कचरा असून, खोलीला गळतीही आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने येथे कुठलीही अनुचित घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
शिक्षण समितीने वारंवार स्वयंपाकघराची मागणी करूनही शासन याकडे लक्ष देत नसल्याने कोरेगाव येथील पालक वर्गात असंतोष पसरला आहे.
शाळेत शिक्षक व चपराशी यांची नव्याने नेमणूक करावी, अन्यथा गावातील सुशिक्षित युवकांची नेमणूक करावी, तसेच मोडकळीस आलेल्या शाळेच्या खोल्या पाडून नवीन इमारत बांधून द्यावी आणि खुल्या जिमची दुरुस्ती करावी, अशी मागणी कोरेगाववासीयांनी केली आहे.
या मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्यास शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा कोरेगाववासीयांनी दिला आहे.