पुणे (Pune Bhandara Hill girl) : देहू परिसरातील भंडारा डोंगरावर दीड वर्षांची चिमुकली एकटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आई-वडिलांचा शोध घेतल्यानंतर अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलीचा सांभाळ करणे शक्य नसल्याने त्यांनी तिला डोंगराजवळ सोडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या प्रकरणी देहू पोलिसांनी चिमुकलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी (Pune Bhandara Hill girl) भंडारा डोंगरावर ही चिमुकली एकटी असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ती आपले नाव किंवा घराचा पत्ता सांगण्याच्या स्थितीत नव्हती. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक काळजी घेण्यात आली.
दरम्यान, चिमुकलीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली. उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करण्यात आला, तसेच (Pune Bhandara Hill girl) सामाजिक माध्यमांवरूनही तिच्या पालकांचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. अखेर पोलिसांना तिच्या आई-वडिलांचा ठावठिकाणा लागला.
पोलिसांच्या चौकशीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समोर आले. मुलीचा सांभाळ करण्याची क्षमता नसल्याने तिला (Pune Bhandara Hill girl) भंडारा डोंगराजवळ सोडल्याची माहिती पालकांनी दिल्याचे समजते. मात्र, कोणतीही परिस्थिती असली तरी एवढ्या लहान मुलीला एकटे सोडणे ही गंभीर बाब असल्याने पोलिसांनी आई-वडिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करत त्यांना अटक केली.