केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले यांचा मुलगा राजवीरही सहलीत; मृत विद्यार्थ्यांच्या यादीत मुलाचे नाव पाहून पोलीस ठाण्यात शोककळा
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. ‘विनर्स अॅकॅडमी’ या कोचिंग क्लासमधील इयत्ता ११वी आणि १२वी विज्ञान शाखेच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आळंदी शहरावर शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती आळंदी पोलीस ठाण्यातील बैठकीदरम्यान मिळाली. केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले हे त्या वेळी बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र, दिवेआगर येथे गेलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण त्यांचा मुलगा राजवीर वहिले याचाही या सहलीत समावेश होता.
🚨SHOCKING | Eight, class 11 and 12 students from Pune drowned after being swept away by strong sea currents at Diveagar beach in Maharashtra's Raigad during a picnic pic.twitter.com/tD7kU1BI4Q
— The Tatva (@thetatvaindia) October 1, 2026
बैठकीतच आली विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी
आळंदी पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचारी बैठकीसाठी जमले असताना पोलीस निरीक्षक भीमा नरके यांना फोन आला. आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कऱ्हाडे यांनी फोनवरून दिवेआगर येथे आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांना तातडीने नगर परिषदेत येण्यास सांगण्यात आले.
या घटनेमुळे सुरू असलेली बैठक रद्द करण्यात आली. दरम्यान, ही माहिती ऐकताच युवराज वहिले यांनी आपला मुलगा राजवीरही त्याच सहलीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअॅपवर मृत विद्यार्थ्यांची नावे असलेली यादी समोर आली.
या यादीत राजवीर वहिले याचेही नाव असल्याचे समोर आले. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच युवराज वहिले यांना मोठा धक्का बसला. पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकारी आणि नागरिकही या घटनेने व्यथित झाले.
४८ जणांचा ग्रुप सहलीसाठी रवाना
‘विनर्स अॅकॅडमी’मधील एकूण ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगर येथे सहलीसाठी आळंदीहून रवाना झाला होता. या पथकात २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक होते.
दिवसभर विविध ठिकाणी पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी पोहोचले. सायंकाळच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी पाण्याच्या जोरदार प्रवाहात ओढले गेले.
या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मृत विद्यार्थ्यांची नावे
दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे यांचा समावेश आहे.
आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे आळंदी तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.