हिंगोली (Farm Loan Waiver Yojana) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत दुसरी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या पत्राद्वारे ही यादी प्रसिद्ध केली आहे. या दुसऱ्या यादीत राज्यातील एकूण 3 लाख 55 हजार 614 शेतकऱ्यांचा समावेश असून आता या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.
या (Farm Loan Waiver Yojana) योजनेची सुरुवात 2 जून 2026 रोजी करण्यात आली होती. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वाटप झालेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. महाआयटीने एकूण 39 लाख 17 हजार खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. त्यापैकी 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी 14 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पहिल्या यादीतील 12 लाख 58 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 1014 कोटी 90 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. 7 ऑगस्ट रोजी 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना 508 कोटी 60 लाख तर 28 ऑगस्ट रोजी 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 506 कोटी 30 लाख रुपये देण्यात आले.
आता जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक 1 लाख 95 हजार 899 शेतकरी आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 45 हजार 222 आणि नांदेड जिल्ह्यातील 39 हजार 255 शेतकऱ्यांचा समावेश आहे. अमरावती विभागात 71 हजार 796, नागपूर विभागात 34 हजार 520, नाशिक विभागात 25 हजार 471, पुणे विभागात 23 हजार 117 आणि कोकण विभागात 4 हजार 811 शेतकरी पात्र ठरले आहेत. बँकनिहाय विचार करता व्यापारी बँकांमधील 3 लाख 14 हजार 563 आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील 41 हजार 51 शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 1 लाख 58 हजार 617 तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे 69 हजार 3 शेतकरी आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही यादी संपूर्ण कर्जमुक्तीची असून 31 मार्च 2026 रोजीची थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ होणार आहे. व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 31 मार्च 2026 रोजी थकबाकी दोन लाखांपेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे निधन झाले आहे किंवा ज्यांचे बोटांचे ठसे येत नाहीत त्यांच्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी स्वतंत्र कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे.
सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. ही यादी सर्व बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.