प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींकडे दुर्लक्ष; ॲप विकसित करणाऱ्या रोजमार्टा ऑटोटेकला महामंडळाकडून २५ कोटींहून अधिक रकमेचे बिल अदा
एसटी बस कुठे आहे, ती स्थानकावर किती वेळात पोहोचणार आहे, याची माहिती प्रवाशांना घरबसल्या मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘आपली एसटी’ मोबाइल ॲपवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धावती बस ॲपच्या ‘रनिंग शेड्यूल’मधून अचानक गायब होणे, चुकीचा वाहन क्रमांक दिसणे, प्रवाशाचे अचूक लोकेशन न दाखवणे आणि बसच्या अपेक्षित आगमनाच्या वेळेत मोठी तफावत आढळणे, अशा अनेक त्रुटींमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या तक्रारी वाढत असतानाच ॲप विकसित करणाऱ्या रोजमार्टा ऑटोटेक कंपनीला महामंडळाने २५ कोटींहून अधिक रुपयांचे बिल अदा केल्याची बाब समोर आली आहे.
एसटी महामंडळाने आपल्या बसगाड्यांची सद्यस्थिती प्रवाशांना डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम (VTS) आणि पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम (PIS) लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ‘रोजमार्टा ऑटोटेक’ या कंपनीसोबत करार करण्यात आला. या व्यवस्थेच्या आधारे ‘आपली एसटी’ मोबाइल ॲप विकसित करण्यात आले.
बसची माहिती मिळवण्यासाठी ॲप, पण माहितीच अचूक नाही
‘आपली एसटी’च्या माध्यमातून प्रवाशांना बसचा ठावठिकाणा, प्रवासाची स्थिती आणि संबंधित बस स्थानकावर पोहोचण्याची संभाव्य वेळ समजणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ॲपवरील माहिती आणि एसटीच्या प्रत्यक्ष हालचाली यांच्यात अनेकदा तफावत दिसून येते.
महामंडळाच्या सेवेत असलेल्या प्रत्यक्ष बसगाड्यांच्या तुलनेत ॲपवर कमी बस दाखवल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही मार्गांवर धावणाऱ्या बसचा क्रमांकही चुकीचा प्रदर्शित होतो. बसच्या नियोजित सुटण्याच्या वेळेपासून ते प्रत्यक्ष प्रस्थानापर्यंतच्या माहितीतही फरक आढळतो.
एसटी बस वेळेवर स्थानकातून रवाना झाल्यानंतरही तिच्या हालचालीचे अद्ययावत लोकेशन ॲपवर दिसत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. काही वेळा ॲपमध्ये दाखवलेल्या वेळेपूर्वीच बस प्रत्यक्ष मार्गावर धावत असल्याचेही आढळते. त्यामुळे बसस्थानक किंवा आगारातील अधिकारी आणि प्रवासी यांच्यात गैरसमज होऊन वाद निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत.
‘बस स्टॅंड निअर मी’ सुविधेलाही मर्यादा
प्रवाशांच्या सोयीसाठी ॲपमध्ये जवळचे बसस्थानक शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, ‘बस स्टॅंड निअर मी’ या पर्यायाचा अपेक्षित उपयोग होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या सुविधेत प्रवाशाचे सध्याचे अचूक स्थान प्रदर्शित होत नसल्यामुळे जवळचे बसस्थानक शोधताना अडचणी येतात.
कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या ॲपमध्येच लोकेशनची माहिती अचूक उपलब्ध होत नसल्याने या डिजिटल सुविधेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपेक्षित आगमन वेळेतही विसंगती
बस स्थानकावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज प्रवाशांना मिळावा, यासाठी ॲपमध्ये ‘Expected Arrival Time’ दाखवला जातो. मात्र, काही प्रसंगी बस पोहोचण्यास शून्य मिनिटे बाकी असल्याचे ॲपवर दिसते. प्रत्यक्षात संबंधित बस स्थानकात पोहोचण्यासाठी आणखी १५ ते २० मिनिटे लागतात.
यामुळे प्रवाशांना बस नेमकी कधी येणार, याचा विश्वासार्ह अंदाज घेता येत नाही. याबाबत स्थानक आणि आगारातील नियंत्रण अधिकाऱ्यांकडूनही अनेकदा समाधानकारक माहिती मिळत नसल्याची तक्रार आहे.
ॲप आणि PIS फलकावरील माहिती वेगळी
‘आपली एसटी’ ॲपवरील माहिती आणि बसस्थानकांवर लावण्यात आलेल्या पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम (PIS) फलकावरील तपशील यांच्यातही अनेकदा फरक दिसून येतो. एकाच बसच्या आगमनाबाबत दोन्ही ठिकाणी वेगवेगळा वेळ किंवा स्थिती दिसत असल्याने प्रवाशांचा संभ्रम वाढतो.
बसचे लोकेशन, वाहन क्रमांक, सुटण्याची वेळ, अपेक्षित आगमन आणि बसच्या प्रत्यक्ष अंतरासंदर्भातील माहितीमध्येच विसंगती असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले ‘आपली एसटी’ ॲप सध्या अपेक्षित सुविधा देण्याऐवजी त्यांच्यासाठी अधिक त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ॲपच्या कार्यक्षमतेबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढत असताना ते विकसित करणाऱ्या रोजमार्टा ऑटोटेक कंपनीला महामंडळाने २५ कोटींहून अधिक रकमेचे बिल अदा केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एका बाजूला डिजिटल सेवेवर खर्च होत असताना दुसरीकडे प्रवाशांना मूलभूत आणि अचूक माहिती मिळत नसल्याने या व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.