२८ जुलैच्या पत्राची पुन्हा दिली आठवण; बसस्थानक व आगारातील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी
चिखली : चिखली येथील एसटी बसस्थानक व आगाराच्या आवारात पडलेल्या भीषण खड्ड्यांमुळे एसटी चालक, वाहक आणि प्रवाशांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बिकट समस्येकडे ‘दैनिक देशोन्नती’ने १८ सप्टेंबर २०२६च्या अंकात विशेष बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताचा धसका घेत चिखली आगार व्यवस्थापकांनी तात्काळ बुलढाणा विभागीय नियंत्रकांना पत्र पाठवून बसस्थानक व आगारातील खड्डे तातडीने बुजवण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी २८ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई न झाल्याने आगार व्यवस्थापकांना पुन्हा एकदा या पत्राची आठवण करून द्यावी लागली आहे.
चिखली बसस्थानक हे बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या या बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि आगाराच्या आवारात मोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी व चिखल साचत आहे. त्यामुळे एसटी गाड्यांचे नुकसान तर होतच आहे, शिवाय अपघाताची शक्यता वाढून चालक वर्ग, प्रवासी, पादचारी व दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत.
या समस्येबाबत चिखली आगार व्यवस्थापक यांनी दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी विभागीय नियंत्रक, रा.प. बुलढाणा यांना जावक क्रमांक २३८ अन्वये पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, आगारातील खड्ड्यांबाबत २८ जुलै २०२६ रोजी पत्र (जा.क्र. १५७) पाठवून माहिती देण्यात आली होती. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. काल १८ सप्टेंबर रोजी ‘देशोन्नती’ वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे एसटी महामंडळाची जनमानसात प्रतिमा मलीन होत आहे.
प्रवाशांचा आणि एसटी कर्मचाऱ्यांचा हा मनस्ताप थांबवण्यासाठी बसस्थानक व आगारातील खड्डे वरिष्ठ स्तरावरून तात्काळ व्यवस्थित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच या पत्राची प्रत विभागीय स्थापत्य अभियंता, बुलढाणा यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.
आता तरी या स्मरणपत्रानंतर आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर वरिष्ठ प्रशासन या खड्ड्यांची दुरुस्ती करणार की प्रवाशांना असाच त्रास सहन करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.