विषारी द्रव्य प्राशन करुन संपविले जीवन; मानवत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद
मानवत (Parbhani Farmer suicides) : तालुक्यातील सारंगापूर येथे कर्जाच्या तणावातून ५५ वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. बन्सी आश्रोबा चौखट असे मयत शेतकर्याचे नाव असून या प्रकरणी मानवत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बन्सी चौखट यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याने ते काही दिवसापासून चिंतेत होते. कर्ज कसे फेडायचे या विवंवचेत होते.याबाबत ते नातेवाइकांकडे चिंता व्यक्त करत असल्याचे त्यांचा पुतण्या अनिल चौखट यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते शेताकडे गेले होते. तेथे त्यांनी कर्ज कसे फेडू म्हणून विषारी औषध प्राशन करून जीव देत असल्याचे त्यांचा मुलगा पांडूरंग यास फोन करुन सांगितल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली.
त्यावेळी ते चिंचेच्या झाडाखाली पडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या शेजारी औषधाचा डबा पडलेला होता. नातेवाइकांनी उपचारासाठी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या घटनेची मानवत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.