दूरसंचार विभागाचा इशारा; ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद, नागरिकांना ‘संचार साथी’वर अनधिकृत क्रमांक तपासण्याचे आवाहन
तुमच्या ओळखपत्राचा वापर करून घेतलेले SIM कार्ड दुसऱ्या व्यक्तीला देणे, विकणे किंवा भाड्याने देणे आता कायदेशीर अडचणीत आणू शकते. दूरसंचार विभागाने फसवणुकीच्या उद्देशाने SIM कार्डची खरेदी-विक्री, दूरसंचार ओळख क्रमांकांचा गैरवापर आणि मोबाईलच्या IMEI क्रमांकात फेरफार करण्याबाबत कठोर इशारा दिला आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
सायबर फसवणुकीसाठी इतरांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून SIM कार्ड सक्रिय करण्याच्या घटना समोर आल्यानंतर दूरसंचार विभागाने नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. छत्तीसगडमध्ये एका एजंटने नागरिकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत त्यांच्या माहितीशिवाय २५ बनावट SIM कार्ड सक्रिय केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणातील सर्व संबंधित क्रमांक ब्लॉक करण्यात आले असून संबंधित एजंटला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
‘म्युल सिम’चा वापर सायबर फसवणुकीसाठी
सरकारच्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या ओळखपत्रावर सक्रिय असलेले SIM कार्ड सायबर गुन्ह्यासाठी वापरले गेल्यास मूळ ग्राहकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारच्या SIM कार्डला ‘म्युल सिम’ म्हटले जाते.
याशिवाय कॉलिंग आयडीमध्ये फेरबदल करून किंवा विविध ॲप्सच्या माध्यमातून बनावट क्रमांकावरून कॉल करणे हेदेखील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचे कृत्य मानले जात आहे.
एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड?
देशात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ SIM कार्ड ठेवण्याची मर्यादा आहे. मात्र, जम्मू आणि काश्मीर, आसाम तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा ६ SIM कार्डांची आहे.
निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक SIM कार्ड असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी सरकारने Digital Intelligence Platform वर फोटो दाखवणारे नवीन पोर्टल जोडले आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या प्रणाली या पोर्टलशी जोडण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
‘संचार साथी’वर नंबर तपासण्याचा सल्ला
आपल्या ओळखपत्रावर आपल्या माहितीशिवाय कोणताही मोबाईल क्रमांक सक्रिय आहे का, याची नागरिकांनी तपासणी करावी, असे दूरसंचार विभागाने आवाहन केले आहे. यासाठी नागरिकांनी ‘संचार साथी’ पोर्टल किंवा ॲपचा वापर करून आपल्या नावावर सक्रिय असलेल्या मोबाईल क्रमांकांची माहिती तपासावी.
अनधिकृत किंवा अज्ञात क्रमांक आपल्या नावावर सक्रिय असल्याचे आढळल्यास त्याबाबत तातडीने आवश्यक कारवाई करण्याचा सल्लाही विभागाने दिला आहे.