कान्हेगाव तलाठी लाच प्रकरण

लाच प्रकरणात कान्हेगावच्या तलाठी महिलेचे निलंबन

Kanhegaon Talathi Bribery Case: कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील तलाठी महिलेने एका व्यक्तीकडून ५०० रुपयाची लाच स्विकारली होती. या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

लाच प्रकरणात कान्हेगावच्या तलाठी महिलेचे निलंबन

Kanhegaon Talathi Bribery Case

 

५०० रुपयाची स्विकारली होती लाच; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आदेश

हिंगोली (Kanhegaon Talathi Bribery Case) : कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील तलाठी महिलेने एका व्यक्तीकडून ५०० रुपयाची लाच स्विकारली होती. या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तलाठी सुवर्णमाला वसंतराव सिरसाट यांच्या निलंबनाचे आदेश काढले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका व्यक्तीच्या शेतामध्ये एक वर्षापुर्वी बोअरवेल घेतला होता. सदर शेतातील बोरवेलची सातबारा व नमुना नं.१४ वर नोंद घेण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव सज्जाच्या ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) श्रीमती सुवर्णमाला वसंतराव सिरसाट ह्या ५०० रुपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार १८ ऑगस्टला लाच लुचपत प्रतिबंधक विभागात केली होती. या तक्रारीची पडताळणी १९ ऑगस्टला करण्यात आली होती. त्यावरून पोलिस उपाधिक्षक विकास घनवट यांच्या मार्गदशर्नाखाली सापळा रचण्यात आला असता आखाडा बाळापूर येथे तलाठी सुवर्णमाला सिरसाट यांच्या खासगी कार्यालयात त्यांनी तक्रारदाराकडून ५०० रुपयाची लाच स्विकारल्याने एसीबीच्या पथकाने त्यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले होते.

या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केला होता. 
त्यावरून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कान्हेगावच्या ग्राम महसुल अधिकारी श्रीमती सुवर्णामाला वसंतराव सिरसाट यांना १९ ऑगस्टपासून शासन सेवेतून निलंबित करण्याबाबतचे आदेश काढले. त्यांनी लाचेची रक्कम स्विकारून आर्थिक फायदा केल्याचे दिसून आल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्या विरूध्द विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असुन निलंबन कालावधीत सेनगाव तहसिल कार्यालय येथे उपस्थित राहण्याचे आदेशात नमुद करण्यात आले.