प्रशासनाच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांचीच तिलांजली; गैरहजर कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणार : उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर
रिसोड : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नोंदींमधील दुरुस्ती तसेच नाव वगळणीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी रिसोड शहरासह तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चार दिवसीय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या तारखांना विशेष शिबिरे आणि बीएलओंची उपस्थिती निश्चित करण्यात आल्याची अधिकृत माहितीही उपलब्ध आहे.
मात्र, प्रत्यक्षात अनेक केंद्रांवर संबंधित बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) गैरहजर राहिल्याने हे शिबिर केवळ कागदावरच असल्याचे चित्र समोर आले आहे.
रिसोड शहरातील भारत माध्यमिक भारत प्राथमिक शाळेत एकूण नऊ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रावर नवीन मतदार नोंदणीसाठी दुपारच्या सुमारास अनेक नवमतदार व नागरिक पोहोचले. मात्र, तिथे एकही कर्मचारी अथवा बीएलओ उपस्थित नव्हता. नागरिकांनी केंद्रावर बराच वेळ वाट पाहिली. अखेर नोंदणी न होताच मतदारांना रिकाम्या हाताने परतावे लागले. केवळ याच केंद्रावर नव्हे, तर परिसरातील इतरही केंद्रांवर अशीच परिस्थिती दिसून आली.
मुख्यालयाच्या शहरातच जर प्रशासकीय आवाहनाला केराची टोपली दाखवत कर्मचारी दांडी मारत असतील, तर तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर काय स्थिती असेल, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाच्या इतक्या महत्त्वाच्या मोहिमेबाबत जबाबदार कर्मचाऱ्यांमध्ये अजिबात गांभीर्य नसल्याचे यावरून उघड झाले आहे.
चौकशी करून कारवाई करणार : उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, शिबिराच्या वेळेत मतदान केंद्रांवर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्यात येईल व दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी मांडली आहे.