मानोरा : गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवी येथे धर्मगुरु जितेंद्र महाराज यांच्या हस्ते ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) या राष्ट्रीय मंचावर २५ लाख रुपये जिंकून गोर बंजारा समाजाचे नाव रोशन केल्याबद्दल मंगरूळपीर तालुका कळंबा बोडके येथील विशाल प्रेमचंद राठोड यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
सामान्य कुटुंबातील असूनही जिद्द, मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर विशाल राठोड यांनी अमिताभ बच्चन यांच्या केबीसी मंचावर २५ लाख रुपयांपर्यंत मजल मारली. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण बंजारा समाजात आनंदाचे वातावरण असून, समाजातील युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
यावेळी धर्मपीठावर धर्मगुरु जितेंद्र महाराज यांनी विशाल यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशाल राठोड यांच्या या ऐतिहासिक यशामुळे पोहरादेवी नगरीसह वाशिम जिल्ह्यात अभिमानाची लाट उसळली आहे.