मानोरा : अमरावती येथून गावी परतत असताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एका भरधाव मालवाहू पिकअपने जोरदार धडक दिल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी डोंगरगाव फाट्यापुढे घडली. याप्रकरणी धनज पोलीस स्टेशनमध्ये ३० सप्टेंबरला अधिकृत जबानी देऊनही पोलिसांनी अद्याप अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी गंभीर शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन न्याय देण्याची मागणी पीडित अपघातग्रस्त युवकाने केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मूळ रहिवासी आसोला खुर्द (ह.मु. नाईक नगर, मानोरा) येथील वैभव बलदेव राठोड हा तरुण अमरावती येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. २६ सप्टेंबर रोजी तो अमरावतीहून मानोरा येथे गावी येत होता. डोंगरगाव फाट्यापासून पुढे दर्ग्यासमोरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. MH 48 - 2273) या वाहनाने वैभवला जोरदार धडक दिली. या अपघातात वैभव खाली पडून गंभीर जखमी झाला व त्याच्या तोंडाला मोठा मार लागला.
नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. यावेळी पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने वैभवला तत्काळ कामरगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने नातेवाईकांशी संपर्क साधला असता, नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय
याप्रकरणी प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर वैभव राठोड याने ३० सप्टेंबर रोजी धनज पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराचा सविस्तर ‘जबानी रिपोर्ट’ दिला. मात्र, रीतसर तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप धडक देणारे बोलेरो पिकअप वाहन ताब्यात घेतलेले नाही. विशेष म्हणजे, घटनास्थळी समोरच दर्गा असल्याने तेथील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांमध्ये हा संपूर्ण अपघात स्पष्टपणे कैद झालेला आहे.
सीसीटीव्ही पुरावा आणि तक्रार उपलब्ध असतानाही पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करत असून ‘पाहूनही आंधळे-बहिरे असल्याचे सोंग’ घेत असल्याचा आरोप जखमी विद्यार्थ्याने केला आहे.
धनज पोलिसांच्या या संशयास्पद कार्यपद्धतीमुळे अपघातातील दोषीला पाठीशी घातले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी व आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी वैभव राठोड याने केली आहे.