शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधींवर संताप; जिल्हाधिकारी म्हणतात, ‘ती’ यादीच बनावट!
लातूर : महाराष्ट्रात ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्याची यादी जाहीर झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचे नाव त्यात नसल्याने खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधींविषयी संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, सोशल मीडियावर दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’बाबत व्हायरल होत असलेली सदर यादी पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
शासन किंवा प्रशासनाच्यावतीने कोणत्याही दुष्काळ किंवा तत्सम उपाययोजनांची घोषणा करताना अधिकृत शासकीय पत्र किंवा परिपत्रकाद्वारे माहिती दिली जाते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या आणि जिल्हा प्रशासनाने बोगस म्हणून स्पष्ट केलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळ ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांच्या यादीत राज्यातील १४० तालुके दिसत आहेत. विशेष म्हणजे, पिके करपून गेलेल्या आणि दुष्काळाने होरपळत असलेल्या लातूर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा या यादीत समावेश नाही.
दरम्यान, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची बनावट यादी समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे सांगितले. या यादीचा शोध घेऊन ती तात्काळ समाजमाध्यमांवरून हटवण्याचे निर्देश त्यांनी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाच्या पीक परिस्थिती आढावा बैठकीत ऑनलाइन सहभागी होत दिले आहेत.
इतकेच नव्हे, तर लातूर जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व ६० महसूल मंडळांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सलग चार आठवडे पाऊस न पडल्यास ‘ट्रिगर-१’ लागू होतो. मात्र, लातूर जिल्ह्यात सलग चार आठवडे पाऊस न पडलेल्या तालुक्यांची यादी जिल्हा प्रशासनाने या स्पष्टीकरणासोबत का जाहीर केली नाही? असा सवाल या निमित्ताने शेतकरी उपस्थित करीत आहेत.
लातूर जिल्ह्यात जमिनीतील ओलावा संपून पिकांची वाढ खुंटली आहे. शिवाय, हलक्या आणि माळरान जमिनीतील पिके करपून गेली आहेत. मात्र, पर्जन्यमापकात प्रशासनाकडून होणारी पावसाची नोंद मोठी गमतीशीर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आजचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघातील अहमदपूर तालुक्यात ०.२ मिमी, तर चाकूर तालुक्यात १.३ मिमी पाऊस पडला. लातूर १.६, औसा ०.६, निलंगा ०.५, रेणापूर १.८, देवणी ०, शिरूर अनंतपाळ ०.८ आणि जळकोटमध्ये ०.२ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ०.८ मिमी पाऊस नोंदला गेला.
चार आठवड्यांत असा पाऊस किती वेळा नोंदला गेला? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नागरिकांना केवळ संकेतस्थळांना भेट देण्याचे आवाहन करण्यापेक्षा नेमके कोणते संकेतस्थळ, हे प्रशासनाने स्पष्ट का केले नाही? अशीही भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
ट्रिगर-१ म्हणजे काय?
भारत सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन नियमावलीनुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठीची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे ‘ट्रिगर-१’. जेव्हा एखाद्या भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो आणि सलग चार आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडतो, तेव्हा ‘ट्रिगर-१’ लागू होतो.
यामध्ये दोन मुख्य गोष्टी तपासल्या जातात.
१. पावसातील तूट : चालू हंगामात पडलेला पाऊस हा त्या भागाच्या सरासरी पावसापेक्षा लक्षणीयरीत्या कमी असणे.
२. पावसाचा खंड : पावसाच्या मुख्य हंगामात, उदाहरणार्थ मान्सूनमध्ये, सलग ३ ते ४ आठवडे (२१ ते २८ दिवस) ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडणे.
जेव्हा हे दोन्ही निकष एकत्र पूर्ण होतात, तेव्हा शासकीय यंत्रणेत ‘दुष्काळाची पहिली चेतावणी’ म्हणजेच ‘ट्रिगर-१’ ऑन होतो. ‘ट्रिगर-१’ लागू झाल्यानंतर थेट दुष्काळ जाहीर होतो असे नाही, तर ती दुष्काळ तपासणीची सुरुवात असते.