दयानंद सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रम; कृष्णा साळुंखे यांचे पखावज वादन आणि डॉ. वृषाली देशमुख यांचे शास्त्रीय गायन
लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’ या अभिजात शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता दयानंद सभागृहात हा संगीत कार्यक्रम रंगणार आहे.
यंदाच्या संगीत दरबारात पुणे येथील विख्यात पखावज वादक कृष्णा साळुंखे यांच्या दमदार पखावज वादनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. यासोबतच लातूरच्या प्रसिद्ध गायिका डॉ. वृषाली देशमुख यांच्या शास्त्रीय गायनाची मैफलही आयोजित करण्यात आली आहे.
अभिजात भारतीय संगीताची समृद्ध परंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला आहे.
लातूरची सांस्कृतिक चळवळ सातत्याने सजीव ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने या संगीत दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. मागील १३८ महिन्यांपासून प्रतिष्ठानकडून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
या संगीत उपक्रमामागे राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची संकल्पना आणि प्रेरणा आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.