गोरेगाव (Maratha Reservation) : मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची शासनाने तातडीने दखल घ्यावी या मागणीसाठी गोरेगाव येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बुधवार दि. ३ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कडकडीत बंद पाळुन समर्थन देण्यात आले आहे.
गोरेगाव येथील सकल मराठा समाज बांधव संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत जोडलेले आहेत प्रत्येक आंदोलनात गोरेगावकरांचा सहभाग राहलेला आहे आतंरवाली सराटी येथे येथे गेल्या पाच दिवसापासून उपोषण आंदोलन सुरू आहे याबाबत दि. २ सप्टेंबर रोजी (Maratha Reservation) सकल मराठा समाजाच्या वतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गोरेगाव बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत गोरेगावातील लहान-मोठ्या सर्व व्यावसायिकांनी, व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतील औषध विक्रेत्यांनी देखील दुपारी १ वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून सामाजिक बांधिलकी जपली.मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाची दुटप्पी भूमिका, समाजाची होत असलेली हेटाळणी आणि मागासलेपण वाढत असतानाही शासन निर्णयावर ठाम नसल्याने समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक होत असल्याने समाज बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे शासनाने गांभीर्याने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा व राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. गोरेगाव येथील हा बंद पूर्णतः शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी झाला असून भविष्यात जर उपोषण असेच सुरू राहिले तर पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची रणनीती जाहीर करण्यात येईल, असे संकेत यावेळी देण्यात आले आहेत ३ सप्टेंबर चा बंद शांततेत पार पडला असुन यशस्वी झाला आहे बंद दरम्यान ठाणेदार हनुमंत भिंगारे यांचे मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जवळा बाजार येथे बंद शांततेत
जवळा बाजार : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाचा सहावा दिवस असून सुद्धा राज्य शासनाने उपोषणाची दखल घेतली नाही व मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून उपोषणाच्या समर्थनार्थ जवळाबाजार येथे गुरुवार रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. हा बंद शांततेत पार पडला असून 100% यशस्वी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने राज्य राखीव दलाची एक तुकडी गावात बंदोबस्तासाठी तैनात केली होती.

डोंगरकडा येथे कडकडीत बंद
डोंगरकडा : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा म्हणून कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे 100% बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये कुठेही अनुचित प्रकार न घडता यशस्वी पार पडला. सकल मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर डोंगरकडा बंद च्या हाकेला प्रतिसाद देत सर्व व्यावसाईक यांनी आपली दुकाने, टपऱ्या, हॉटेल सर्व व्यवहार बंद ठेवले. त्यात फक्त मेडिकल, दूध डेअरी शाळा वगळता बंद यशस्वी झाला आहे. या बंदमध्ये सर्व धर्मियांनी साथ दिली हे विशेष.