घोरपडीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकात भीषण अपघात; १८ वर्षीय बहिण गंभीर जखमी, बसचालकाविरोधात गुन्हा दाखल
पुण्यातील घोरपडी परिसरात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकात भरधाव मिनी स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर बहीण-भाऊ दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात बसच्या चाकाखाली सापडल्याने रोहित लक्ष्मण कुदळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार त्याच्या बहिणीच्या डोळ्यांसमोर घडला.
बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. मांजरी परिसरातील रहिवासी रिया लक्ष्मण कुदळे (वय १८ वर्षे) ही स्कूटर चालवत होती, तर तिचा भाऊ रोहित लक्ष्मण कुदळे (वय १६ वर्षे) तिच्या मागे बसला होता. दोघे राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकातून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मिनी स्कूल बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
धडकेनंतर रिया आणि रोहित दोघेही रस्त्यावर कोसळले. अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच रोहितची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. रिया गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात स्कूल बसचालक सागर याच्यावर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याचा आरोप आहे. रिया कुदळे हिच्या तक्रारीवरून वानवडी पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.